yuva MAharashtra कृष्णानदीतील धोकादायक मगरींचे सुरक्षित अधिवासात स्थलांतर करा; प्रदीपआप्पा कदम यांची वनविभागाकडे मागणी

कृष्णानदीतील धोकादायक मगरींचे सुरक्षित अधिवासात स्थलांतर करा; प्रदीपआप्पा कदम यांची वनविभागाकडे मागणी

 


पलूस दि. ०८ : कृष्णानदीतील मगरींच्या वाढत्या वावरामुळे पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मगरींच्या हल्ल्यांमध्ये नागरिक जखमी झाल्याच्या तसेच काहींना कायमचे अपंगत्व आल्याच्या घटना घडल्या असून, जीवितहानीही झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम यांनी म्हटले आहे. त्यामुळे कृष्णानदीतील धोकादायक मगरींना सुरक्षितपणे पकडून त्यांच्या नैसर्गिक अधिवासात स्थलांतरित करावे, अशी मागणी त्यांनी वनविभागाकडे केली आहे.

याबाबत प्रदीपआप्पा कदम यांनी वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांना निवेदन देऊन पलूस तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

पलूस तालुक्यातील कृष्णानदीच्या पात्रात मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. शेतीची कामे, जनावरांना पाणी पाजणे, कपडे धुणे तसेच दैनंदिन कामांसाठी नागरिकांना नदीकाठी जावे लागते. मात्र, नदीपात्रातील मगरींच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन नदीकाठी जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘कृष्णा’ घाटावर तरुणावर मगरीचा हल्ला

भिलवडी येथील ‘कृष्णा’ घाटावर नुकताच धुण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर नदीकाठच्या परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही काळात पलूस तालुक्यात मगरींच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असून, शेतकरी, महिला आणि अन्य नागरिक गंभीर जखमी झाल्याचे कदम यांनी निवेदनात नमूद केले आहे. काही नागरिकांना कायमचे अपंगत्व आले असून, काहींना जीवही गमवावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.




मगरींचे सुरक्षित स्थलांतर करण्याची मागणी

कृष्णानदी ही पलूस तालुक्यातील नागरिकांच्या जीवनाशी आणि शेतीशी जोडलेली आहे. त्यामुळे नदीकाठी जाणे टाळणे अनेक नागरिकांना शक्य नाही. अशा परिस्थितीत मगरींच्या हल्ल्याचा धोका कायम राहिल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 

वनविभागाने केवळ दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना न करता मगरींच्या सुरक्षित स्थलांतरासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी प्रदीपआप्पा कदम यांनी केली आहे.

मगरींना कोणतीही इजा न पोहोचवता वनविभागाच्या तज्ज्ञ पथकाच्या मदतीने त्यांना सुरक्षितपणे पकडावे आणि योग्य नैसर्गिक अधिवासात सोडावे. तसेच नदीकाठच्या धोकादायक ठिकाणी सूचना फलक, सुरक्षा उपाययोजना आणि जनजागृती मोहीम राबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या जीविताचा प्रश्न अत्यंत गंभीर असून वनविभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी. पलूस तालुक्यातील नागरिकांना मगरींच्या भीतीतून मुक्त करून सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी प्रदीपआप्पा कदम यांनी केली आहे.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰