yuva MAharashtra सकटे कुटुंबीयांवरील अन्यायाविरोधात ईश्वरपूर डीवायएसपी कार्यालयावर ‘बोंबाबोंब व ठिय्या’ आंदोलन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सचिन जाधव यांचा सवाल

सकटे कुटुंबीयांवरील अन्यायाविरोधात ईश्वरपूर डीवायएसपी कार्यालयावर ‘बोंबाबोंब व ठिय्या’ आंदोलन गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सचिन जाधव यांचा सवाल





ईश्वरपूर, दि. ०८ : डोंगरवाडी, ता. वाळवा येथील रविंद्र सकटे व महादेव सकटे कुटुंबीयांवर झालेल्या कथित अन्यायाच्या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, तसेच सकटे कुटुंबीयांना न्याय मिळावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), वाळवा तालुका व समविचारी पक्ष-संघटनांच्या वतीने ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर ‘बोंबाबोंब व ठिय्या’ आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली. सकटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कुरळप पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील हे आजारी असल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कार्यालयात अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.

ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी डीवायएसपी आजारी असून दोन दिवसांनी ते हजर होतील, तोपर्यंत वेळ द्यावा, त्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र आंदोलकांनी हे आश्वासन नाकारत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी कायम ठेवली.

रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. डीवायएसपी आजारी असल्याने पर्यायी अधिकारी नियुक्त नसल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले.




दरम्यान, कुरळप पोलिसांनी सकटे कुटुंबीयांच्या तक्रारीची चौकशी करून त्याबाबत लेखी कळविले असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी असताना केवळ चौकशी करून कारवाईची टोलवाटोलवी का?, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

१५ ऑक्टोबरला कोल्हापूरकडे लाँगमार्चचा इशारा

सकटे कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पीडित सकटे कुटुंबीयांसह मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे पायी लाँगमार्च काढून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा आरपीआयचे जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी केली.

पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

हे आंदोलन सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सकटे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“गुन्हा दाखल होईपर्यंत संघर्ष थांबणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰