सांगली, दि. 17 (जि. मा. का.) : शासकीय नोकरांच्या भ्रष्टाचाराविषयी तक्रार करावयाची असेल तर नागरिकांना सांगलीला यावे लागते. हे टाळण्यासाठी व नागरिकांशी थेट संपर्क व्हावा, यासाठी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली लोकांपर्यंत जाणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्यात जाणार आहेत. तेथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहेत. नागरीक या वेळेत अॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांच्याकडील माहिती, तक्रारी सादर करु शकतात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, अनेकदा नागरिकांना शंका असते की आपण तक्रार दिली तर, आपले काम होणार नाही. आपली अडवणूक केली जाईल. लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अधिकारी नागरिकांच्या शंकाचे निरसन करतील. या लोकसंवादाची प्रसिध्दी प्रत्येक तालुक्यात करण्यात येणार आहे. त्यासाठी हँडबिले, स्टिकर तयार करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे काम कसे चालते याची माहिती नागरिकांना देऊन त्यांच्या आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. नागरीकांनी त्यांच्या तक्रारी टोल फ्री नंबर 1064, फोन क्रमांक, 0233-2373095 किंवा मोबाईल क्रमांक 94040411064 वर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्या बाबतचा तपशिल (ठिकाण, वार व दिनांक) पुढीलप्रमाणे – आटपाडी – शनिवार दि. 21 फेब्रुवारी 2026, विटा – सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026, कवठेमहांकाळ – मंगळवार दि. 24 फेब्रुवारी 2026, मिरज – बुधवार दि. 25 फेब्रुवारी 2026, तासगाव – गुरूवार दि. 26 फेब्रुवारी 2026, कडेगाव – शुक्रवार दि. 27 फेब्रुवारी 2026, शिराळा – सोमवार दि. 2 मार्च 2026, जत – मंगळवार दि. 3 मार्च 2026, इस्लामपूर गुरूवार दि. 5 मार्च 2026, पलूस – मंगळवार दि. 10 मार्च 2026.



