औदुंबर दि. १७ : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त औदुंबर येथे १००८ नारळांपासून साकारलेल्या भव्य शिवलिंगाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भिलवडी सेवाकेंद्राच्या वतीने आयोजित या अनोख्या उपक्रमाने पंचक्रोशीत विशेष आकर्षण ठरले.
शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता उद्योजक गिरीश चितळे, उद्योजक राजेश चौगुले तसेच भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते या शिवलिंगाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतीक पाटील, सुदीप गडदे, पंचायत समिती सदस्य शोभा हजारे, हजरबी सलामत यांच्यासह भिलवडी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘जागरण अंतर्मनाचे’ कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध
उद्घाटनानंतर ‘जागरण अंतर्मनाचे’ हा विशेष आध्यात्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी सुनीता बेहनजी यांनी उपस्थितांना आत्मिक शांती, सकारात्मक विचार आणि ईश्वरीय गुणांच्या जागृतीविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रभावी भाषणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
भिलवडी सेवाकेंद्राच्या संचालिका मीरा बहेनजी यांनी सांगितले की, ब्रह्माकुमारी संस्थेच्या ९० व्या त्रिमूर्ती शिवरात्री महोत्सवानिमित्त औदुंबर येथे प्रथमच १००८ नारळांपासून शिवलिंग साकारण्यात आले आहे. “या शिवलिंगाच्या दर्शनातून मानवातील ईश्वरीय गुणांची जागृती व्हावी, हा आमचा मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्या पुढे म्हणाल्या की, ब्रह्माकुमारी विद्यालयात मानवी जीवनातील ताणतणाव दूर करून आंतरिक शांती मिळवण्यासाठी आध्यात्मिक शिक्षण दिले जाते. ईश्वर हा निराकार ज्योतिर्लिंग स्वरूप ‘शिव’ असून तो सर्व गुणांचा सागर आहे. मन एकाग्र करून परमात्म्याशी संबंध जोडण्यासाठी सहज राजयोग शिकवला जातो. सेवाकेंद्रावर सर्वांसाठी विनामूल्य ७ दिवसांचा राजयोग कोर्सही उपलब्ध आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने साकारलेले हे अनोखे शिवलिंग आणि आध्यात्मिक संदेश यामुळे औदुंबर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.



