सांगली, दि. 8 (जि. मा. का.) : जिल्ह्यात दि.११ ते २० ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव सण उत्साहात व मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असून, नवरात्र उत्सव मंडळाकडून आगमन मिरवणुका दसऱ्या दिवशी दुर्गा विसर्जन मिरवणुकांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. या अनुषंगाने नवरात्र उत्सव २०२६ हा शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण जिल्ह्यात डॉल्बी, डॉल्बी सदृष्य वाद्ये, डीजे व अतिउच्च ध्वनीक्षेपक यांच्या वापरास निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ प्रमाणे याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.
याबाबतच्या आदेशानुसार संपूर्ण सांगली जिल्ह्यात दिनांक ०९.१०.२०२६ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक २१.१०.२०२६ रोजीचे २३.५९ या वेळेत नवरात्र उत्सव व इतर सण उत्सवाचे अनुषंगाने मिरवणुकीत/रास दांडिया/गरबा कार्यक्रमात, सार्वजनिक ठिकाणी, मार्गावर, रस्त्यावर, कोणत्याही व्यक्ती, संस्था, कंपनी, सार्वजनिक मंडळे किंवा नवरात्र मंडळे यांना तसेच इतर सणांच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाचे आयोजक / संयोजक, सदस्य तसेच वाद्य मालक, चालक, व्यवस्थापक अथवा ताबाधारक यांनी डॉल्बी, डॉल्बी सदृष्य वाद्ये, डीजे व अतिउच्च ध्वनिक्षेपक यांचा वापर करणार नाही अथवा उपयोगात आणू नये म्हणून निर्बंध घालण्यात आले आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


