yuva MAharashtra पालकांनी अल्पवयीन मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास देऊ नये..गि. ग. कांबळे

पालकांनी अल्पवयीन मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास देऊ नये..गि. ग. कांबळे

 कुंडल येथे कायदेविषयक जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न


 

        सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली यांच्या वतीने प्रतिनिधी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कुंडल येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

 

            कार्यक्रमास पॅनेल विधिज्ञ ॲड. समीर लाड, मुख्याध्यापिका जे. ए. पट्टणशेट्टी, अॅड. जमीर पटेल यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 



            अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सचिव गि. ग. कांबळे यांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच वैध वाहन परवाना घेऊन वाहन चालविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पालकांनी अल्पवयीन मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास देऊ नये, अन्यथा वाहन मालकावर गंभीर गुन्हा दाखल होऊन आर्थिक दंडाची कारवाई होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. याशिवाय बालकांचे हक्क, शिक्षणाचा मूलभूत अधिकार, बालविवाह प्रतिबंधक कायदा, महिलांना भारतीय राज्यघटनेने दिलेले समानतेचे अधिकार तसेच गर्भलिंग तपासणी हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून त्यासाठी असलेल्या शिक्षेच्या तरतुदींबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

 

            ॲड. जमीर पटेल यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देताना शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पेन्शन आदी योजनांचा लाभ नागरिकांनी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधून घ्यावा, असे आवाहन केले.

 

            समीर लाड यांनी चलनक्षम दस्तऐवज विषयावर मार्गदर्शन करताना धनादेश (चेक) बाउन्स होण्याची कारणे, त्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया आणि संबंधित दंडात्मक तरतुदी याविषयी माहिती दिली.

 

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. टी. जाधव यांनी केले. मुख्याध्यापिका जे. ए. पट्टणशेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती लाड यांनी केले, तर आभार श्री. वेताळ यांनी मानले.


  🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰