पलूस, प्रतिनिधी : दि. २३ जुलै २०२६
दिल्ली येथील जंतर-मंतर परिसरात आंदोलन करणाऱ्या युवकांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जाचा निषेध करत तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पलूस वकिल संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. २२ जुलै) तहसीलदार, पलूस यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, NEET परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सोनम वांगचूक यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. आंदोलनादरम्यान त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
याशिवाय, या आंदोलनाला देशभरातील युवकांनी पाठिंबा दिला असताना त्यांच्यावरही पोलिसांनी कथित अमानुष लाठीचार्ज व हल्ला केल्याचा निषेध पलूस वकिल संघटनेने व्यक्त केला आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेला अधिकार अबाधित राहिला पाहिजे. आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर होऊ नये आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे, अशी मागणीही संघटनेने निवेदनाद्वारे केली.
तहसीलदारांमार्फत केंद्र सरकारकडे व संबंधित प्रशासनाकडे या मागण्यांचे निवेदन पाठविण्याची विनंती करण्यात आली. या प्रसंगी पलूस वकिल संघटनेच्या सदस्यांनी आंदोलनकर्त्यांशी ऐक्य व्यक्त करत शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
यावेळी ॲड. के.डी.कांबळे, ॲड.एस. एम. धोत्रे,ॲड एस. एम. वाममारे,विकास जाधव, ॲड.आर. एस. गोंदील ,ॲड. व्ही.. एस. चिवटे.ॲड.रियान मुलाणी,ॲड.व्ही.बी.माने,ॲड.पी.ए.फाळके,यांच्यासह पलूस वकिल संघटनेचे सदस्य उपस्थित होते. निवेदनावर संघटनेच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



