भिलवडी, दि. २४ : पर्यावरण संरक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बचतीचा दुहेरी उद्देश साध्य करण्यासाठी चितळे डेअरीने इलेक्ट्रिक वाहनांच्या (इव्ही) वापराला प्रोत्साहन देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. एथर एनर्जी लिमिटेडच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे १०० कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक स्कूटरचे वितरण करण्यात आले आहे.
पलूस तालुक्यातील भिलवडी येथील चितळे डेअरी कॅम्पसमध्ये संस्थेच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या एथर एनर्जीच्या नव्या इव्हींची डिलिव्हरी करण्यात आली. यावेळी चितळे डेअरीचे मॅनेजिंग पार्टनर्स मकरंद चितळे आणि निखिल चितळे यांच्यासह सांगली येथील एथरचे वितरक युनिक ऑटोमोबाइल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चितळे डेअरी गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना इव्ही खरेदीसाठी प्रोत्साहन देत असून, या उपक्रमाला एथर एनर्जी लिमिटेडकडून विशेष सहकार्य मिळत आहे. इव्ही खरेदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून आर्थिक सहाय्यही उपलब्ध करून दिले जात आहे.
याबाबत माहिती देताना निखिल चितळे म्हणाले, "कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही थेट आणि अप्रत्यक्षपणे विविध उपाययोजना राबवत आहोत. चितळे डेअरीमध्ये इव्ही चार्जिंगसाठी वापरली जाणारी वीज ही पवन आणि सौर ऊर्जेतून निर्माण केली जाते. त्यामुळे हा उपक्रम हरित ऊर्जेच्या वापराला चालना देणारा ठरत आहे. कर्मचाऱ्यांच्या वाहतूक खर्चात बचत होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनातही त्यांचा थेट सहभाग वाढणार आहे."
हरित ऊर्जा, शाश्वत विकास आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा समतोल साधणारा हा उपक्रम उद्योग क्षेत्रासाठी आदर्शवत ठरत असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्याच्या दिशेने चितळे डेअरीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.



