सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : अमली पदार्थांच्या विरोधातील लढा अधिक व्यापक करण्यासाठी पोलीस विभागाने संशयित भागांमध्ये नियमितपणे तपासणी करावी. स्थानिक पातळीवर माहिती संकलन वाढवावे. महसूल, ग्रामीण यंत्रणा व कृषि विभागाने सजग राहून कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखू व अमली पदार्थ विक्री होत नसल्याची खात्री करावी. याबाबत ग्रामीण पातळीवरून वेळोवेळी माहिती घ्यावी. अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत वेळोवेळी जनजागृती करून युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी शेतात होणाऱ्या अमली पदार्थांच्या लागवडीबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी माहिती घेण्याच्या तसेच एमआयडीसी क्षेत्रातील बंद कारखाने, गोडाऊन यांची अमली पदार्थ अनुषंगाने वेळोवेळी तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती सादर केली. यावेळी त्यांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कार्यवाही, उपाययोजना व जनजागृती याबाबत सविस्तर आढावा सादर केला. यावेळी त्यांनी एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत सन 2026 मध्ये आजअखेर अमली पदार्थ धाडी (लागवड/वाहतूक/विक्री) अंतर्गत 20 गुन्हे दाखल केले असून 25 जणाना अटक करण्यात आली. यामध्ये 56 लाख 61 हजार 740 रूपये किंमतीचा 246 किलो 456 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तसेच अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांबाबत 25 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.



