सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : राष्ट्रीय सुरक्षा परिषद व केंद्रीय विद्युत प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात Engage, Educate & Empower people to enhance safety या घोषवाक्याखाली दि. 26 जून 2026 ते 2 जुलै 2026 दरम्यान राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये सर्व संबंधीत विभाग, यंत्रणांनी आणि नागरीकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडहाचे अधिक्षक अभियंता हे. ना. गांगुर्डे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, दि. 26 जून 2026 ते 2 जुलै 2026 दरम्यान मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री, मा. अतिरीक्त मुख्य सचिव (ऊर्जा) व मा. मुख्य विद्युत निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये विद्युत निरीक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, विद्युत ठेकेदार, उदवाहन ठेकेदार यांच्या संयुक्त विद्यमाने व सक्रीय सहभागाव्दारे हा सप्ताह सुरक्षेच्या दृष्टीने यशस्वी करण्याचे नियोजन प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यामधील सर्व महानगरपालीका, जिल्हापरीषदा, शाळा, कॉलेज, सर्व शासकीय विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महापारेषण कं, महाजनको यांनी या सप्ताहामध्ये विद्युत व उदवाहन सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती करण्याकरीता सक्रीय सहभाग नोंदवावा. जेणेकरून विद्युत कारणामुळे होणारी जीवित व वित्तहानी जनजागृतीव्दारे टाळता येईल.
विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये पुढील बाबीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. योग्य क्षमतेचा ELCB/RCCB चा अंतर्भाव कसा करावा व तो कार्यान्वीत ठेवण्याचे महत्व अधोरेखीत करणे. आपल्या वीज संचमांडणीस सक्षम अर्थींग करण्याची अवशकता व अर्थींगचे महत्व. 2 Pin Socket ऐवजी 3 Pin Socket च्या वापराचे महत्व. जोड विरहीत व तात्पुरते वायरींगमध्ये असणाऱ्या धोक्याचीं माहिती करून देणे. लहान मुलांना एकट्याने उदवाहनामध्ये प्रवास करू दिल्याने उत्पन्न होणाऱ्या धोक्याची माहिती करून देणे. उदवाहनाचे Over speed governer, ARD चे महत्व व सर्व दरवाजाचे Inter lock योग्यरित्या कार्य करीत असल्याची खात्री करण्याची आवश्यकता पटवून देणे. वीज संचमांडणीचे व उदवाहनाचे काम शासनमान्य ठेकेदाराकडूनच करून घेण्यामुळे वीज संचमांडणी व उदवाहनाच्या सुरक्षिततेमध्ये होणारी वाढ याबाबत चर्चा करणे.

