yuva MAharashtra कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या, बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांवर उपसा बंदी आदेश जारी

कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या, बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांवर उपसा बंदी आदेश जारी



 

-        पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहणार


-        अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा



 

        सांगली दि. 15 (जि. मा. का.) : कोयना धरणातील तसेच विविध मध्यम प्रकल्पांतील उपलब्ध पाणी साठा पुरविणे अत्यावश्यक असल्याने सांगली पाटबंधारे विभागाने कृष्णा नदीवरील उपसा बंदीचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ मधील कलम ११ व ४९ मधील तरतुदींनुसार लागू केलेल्या या आदेशानुसार १५ जून २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत कृष्णा नदीमधून शेतीसाठी  खाजगी उपसा करणाऱ्या व बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांवर उपसा बंदी आदेश जारी करण्यात आला असून पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील, असे सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 

            सांगली पाटबंधारे विभागाच्या वतीने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील (कोयना धरण ते राजापूर कोल्हापूर पद्धती बंधारा राज्य सरहद्दीपर्यंत), मोरणा नदी, मध्यम प्रकल्प मोरणा, संख, दोड्डानाला व बसप्पावाडी प्रकल्पांवरील लाभधारकांनी याची नोंद घ्यावी. प्राप्त परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येईल. उपसाबंदी कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी व औद्योगिक) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करून फौजदारी कारवाई करण्यात येईल, याची गांर्भीयाने नोंद घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे.

 

            धरणातील व प्रकल्पातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी / औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठी प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे, असे आदेशात म्हटले आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰