सांगली, दि. ९ (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व साधनसामग्रीचा आढावा घेण्यात आला असून, पूरस्थितीच्या संभाव्य आव्हानावर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.
आगामी पावसाळा आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासन व सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची व्यापक रंगीत तालीम आयर्विन पूल, कृष्णा नदी येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, संभाव्य पूरस्थितीत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्री, बचाव पथके आणि विविध विभागांच्या सज्जतेची तपासणी करण्यात आली असून आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. बचावकार्यासाठी लागणाऱ्या स्पीड बोटी, रेस्क्यू बोटी, गॅस कटर, शोध व सुटका उपकरणे तसेच इतर यंत्रसामग्री कार्यरत स्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. एखादी व्यक्ती पूरस्थितीत किंवा दुर्घटनेत अडकल्यास तिला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच ग्रामीण भागातही पुरेशा प्रमाणात साहित्य उपलब्ध असून गरजेनुसार आवश्यक ठिकाणी पुरविण्यात येऊ शकतात, असे ते यावेळी म्हणाले.
महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या, सांगलीतील पूरस्थितीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. उपलब्ध बोटी, उपकरणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची सज्जता तपासण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पूरस्थितीमध्ये प्रशासनाकडून ‘आपत्ती मित्र’ ॲपच्या माध्यमातून नियमित माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. प्रशासन संभाव्य पूरपरिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सज्ज असून नागरिकांना सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
पूरप्रवण भागातील स्थलांतराबाबत स्वतंत्र कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली असल्याचे सांगून महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या, ज्या भागांमध्ये ३० ते ३५ फूट पाण्याची पातळी गेल्यानंतर घरांमध्ये पाणी शिरते, त्या भागांतील नागरिकांना आधीच सतर्क करण्यात येणार आहे. पाण्याची पातळी २१ ते २२ फूटांपर्यंत पोहोचताच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. प्रशासनाने निश्चित केलेल्या निवारा केंद्रांमध्ये सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या रंगीत तालीमीत महापालिका अग्निशामक विभाग, मिरज तहसील कार्यालय, सांगली अपर तहसील कार्यालय, रॉयल बोट क्लब, आयुष हेल्पलाइन, एचईआरएफ (HERF) टीम तसेच आपदा मित्र यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी शोध, सुटका व बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आपत्तीच्या काळात विविध यंत्रणा एकत्रितपणे कशा प्रकारे कार्य करतात याचे प्रात्यक्षिक उपस्थितांना पाहायला मिळाले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी बचावकार्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची पाहणी करून त्याच्या उपयुक्ततेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तद्नंतर त्यांनी बोटव्दारे कृष्णा नदीपात्रात पाहणी केली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




