yuva MAharashtra कृष्णा नदी उपसाबंदीवर शेतकऱ्यांचा संताप; आदेश रद्द न झाल्यास ‘रस्ता रोको’चा इशारा

कृष्णा नदी उपसाबंदीवर शेतकऱ्यांचा संताप; आदेश रद्द न झाल्यास ‘रस्ता रोको’चा इशारा

 


सांगली, दि. ४ जून : कृष्णा नदीवरील उपसाबंदी आदेशामुळे बागायती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करत शेतकरी संघटनांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उपसाबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांना रस्ता रोको आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा स्पष्ट इशारा सांगली जिल्हा सहकारी पाणीपुरवठा संस्थांचा सहकारी संघ व सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या वतीने देण्यात आला आहे.

यासंदर्भात सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष तथा आमदार अरुण लाड यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या मांडल्या.

निवेदनात नमूद केल्यानुसार, ४ ते ७ जून २०२६ या कालावधीत कृष्णा नदीतील पाणीउपसा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, गतवर्षी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतानाही योग्य नियोजनाअभावी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने आज पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप शेतकरी प्रतिनिधींनी केला आहे.

यापूर्वी आमदार अरुण लाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पाणी नियोजनाबाबत आश्वासने देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नसल्याचा आरोपही करण्यात आला. समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचा बळी देऊन पाणी पुढे पाठविणे अन्यायकारक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



महावितरणकडून कृषी पंपांना अपुरा वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित वेळ पंप चालविता येत नाही. आठ तासांऐवजी केवळ सहा तास वीज मिळत असून, त्यातही वारंवार खंड पडत असल्याने प्रत्यक्षात चार ते पाच तासच पाणीउपसा शक्य होत आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्याच पाण्याची बचत होत असताना स्वतंत्र उपसाबंदी लादण्याची गरज नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.

"शेतकऱ्यांच्या बागायती पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपसाबंदी आदेश तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा जिल्हाभर तीव्र रस्ता रोको आंदोलन उभारले जाईल," असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असेही शेतकरी प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

दरम्यान, अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर येत्या शुक्रवारी रात्रीपर्यंत उपसाबंदी आदेशाबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही देण्यात आल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली.

यावेळी इरिगेशन फेडरेशनचे उपाध्यक्ष जे. पी. लाड, अशोक पवार, विश्वास पवार, बाबुराव लागरे, विजय पाटील, प्रदीपकुमार पाटील, जे. बी. पाटील, डॉ. नरेंद्र खाडे तसेच विविध पाणीपुरवठा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰