yuva MAharashtra जनतेचा विश्वास जिंकणारे एपीआय भगवान पालवे यांची भिलवडीतून बदली ; उल्लेखनीय कार्यकाळाची यशस्वी सांगता

जनतेचा विश्वास जिंकणारे एपीआय भगवान पालवे यांची भिलवडीतून बदली ; उल्लेखनीय कार्यकाळाची यशस्वी सांगता



भिलवडी दि. ०३ : भिलवडी (ता. पलूस) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांची नुकतीच बदली झाली असून भिलवडी पोलीस ठाण्याला लवकरच नवीन पोलीस अधिकारी मिळणार आहे.

दि. 20 जून 2024 रोजी भिलवडी पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि सामाजिक जनजागृती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.



त्यांच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट 2024 मध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून तब्बल 22 चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. यामुळे सांगलीसह इतर जिल्ह्यांतील 22 गुन्ह्यांची उकल झाली. तसेच फेब्रुवारी 2025 मध्ये बीड जिल्ह्यातील आरोपीस शिताफीने अटक करून भिलवडी, आष्टा व शिरोळ पोलीस ठाण्यांतील तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आणि 7 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फेब्रुवारी 2026 मध्ये आणखी एका आरोपीस ताब्यात घेऊन दोन चोरीचे गुन्हे उघड करण्यात यश आले.

याशिवाय 2022 ते 2026 या कालावधीत हरवलेले तब्बल 22 मोबाईल फोन तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून मूळ मालकांना परत देण्यात आले. गुन्हे उघडकीस आणण्याच्या या प्रभावी कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही भगवान पालवे यांनी प्रभावी नेतृत्व दाखविले. वसगडे येथील रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन, विविध निवडणुका, जयंती उत्सव, यात्रा-महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले. श्रीक्षेत्र औदुंबर येथे दत्तजयंती, गुरुपौर्णिमा व महाशिवरात्रीच्या काळात लाखो भाविकांच्या गर्दीचे यशस्वी नियोजन करण्यात आले.




भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत नियमित पेट्रोलिंग, नाकाबंदी, वाहतूक नियंत्रण आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत झाली आहे. तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, स्वसंरक्षण आणि सामाजिक मूल्यांबाबत जनजागृती करण्यात आली.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय निर्माण करून संघभावनेने काम करण्याची कार्यपद्धती स्वीकारल्याने भिलवडी पोलीस ठाण्याची कामगिरी अधिक प्रभावी झाली आहे. त्यांच्या कार्यकाळात भिलवडी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰