तासगाव दि. २६ : “शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून मोठ्या संधींचा उद्योग आहे. बदलत्या काळात प्रत्येक शेतकरी, विशेषतः तरुणांनी व्यवसायिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. सरकारच्या एमएसपीवर अवलंबून न राहता स्वतःच्या उत्पादनाची किंमत स्वतः ठरवण्याची क्षमता विकसित केली पाहिजे,” असे प्रतिपादन उद्योजक गिरीश चितळे यांनी केले.
हातनूर (ता. तासगाव) येथे आयोजित “शेतीमधील व्यवसायिकता” या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. तासगाव पंचायत समिती, काकासाहेब चितळे फौंडेशन, हातनूर होनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थे” संदर्भात मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर बोडके उपस्थित होते.
“एकाच पिकाऐवजी बहुपीक शेतीची गरज”
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर बोडके यांनी सेंद्रिय भाजीपाला, फळे आणि धान्य यांना देशांतर्गत मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे सांगितले. “एक्स्पोर्टच्या मोहजाळात अडकण्यापेक्षा स्वतःचा ग्राहकवर्ग तयार करून थेट विक्रीचा पॅटर्न निर्माण करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक व विषमुक्त शेतीला चालना देण्याचे आवाहन करताना त्यांनी स्लरी, गोमूत्र, शेणखत यांचा वापर वाढवण्यावर भर दिला. “एकाच पिकावर अवलंबून न राहता बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
“शासकीय यंत्रणेने सल्लागाराची भूमिका निभवावी”
शेतीशी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना केवळ अनुदानापुरते मर्यादित न ठेवता उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका निभवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमात मकरंद चितळे आणि विनय भालचंद्र पोळ यांनीही मार्गदर्शन केले. सूक्ष्म जिवाणूंच्या वापरातून कमी खर्चात उत्पादन वाढवण्याबाबत विनय पोळ यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक हातनूर होनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष अजय पाटील यांनी केले, तर आभार सुनील पाटील यांनी मानले.
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी अतुल कांबळे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत माळी, कृषी सहाय्यक स्नेहल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील यांच्यासह तासगाव, पलूस आणि मिरज तालुक्यातील सेंद्रिय भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात दहा शेतकरी गटांना सेंद्रिय शेती प्रामाणिकरण प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




