- पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करूया
- नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी Universalओ करण्याच्या सूचना
सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : संभाव्य आपत्ती परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे. अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून संबंधित सर्व यंत्रणांनी सदैव सतर्क राहून परस्पर समन्वय ठेवावा. गतअनुभव लक्षात घेता पूरस्थितीत जिल्ह्यातील 100 हून अधिक गावे पूरबाधित होतात. या पार्श्वभूमिवर पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे दिल्या.
आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्रा, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वीच्या सन २०१९ व सन २०२१ मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा अनुभव लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे व सतत सतर्कता ठेवावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत ठेवावा. ग्रामपातळीवर यासाठी नियोजन करावे. धोकादायक इमारतींचे पंचनामे करून ठेवावेत. संबंधितांना याबाबत सूचित करावे. निवाऱ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या शाळा, अंगणवाडी सुस्थितीत असल्याची खात्री करावी. पावसाळ्यातही पाणीगुणवत्ता चांगली राखण्यासाठी तपासणी यंत्रणा कार्यरत ठेवावी. विभाग स्तरावर आपत्ती व्यवस्थापन बैठका घेऊन आराखडे अद्ययावत ठेवावेत. संबंधित सर्व यंत्रणांचे संपर्क क्रमांकही अद्ययावत करावेत. संभाव्य पूरस्थितीत अन्नधान्य वितरण, गॅसवितरण सुरळीत राहील, पशुधन सुस्थितीत राहील यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. आवश्यक तेथे लहान धरणे, पुलांची दुरूस्ती करून घ्यावी. धोकादायक पूल बंद करावेत, असे त्यांनाी सांगितले.
संभाव्य नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवणे, आपत्कालिन कक्ष, नियंत्रण कक्ष, विविध आपत्कालीन संपर्क क्रमांक, बचाव पथक, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, निवारा व्यवस्था, अन्नधान्य, औषधे, जनजागृती, रुग्णवाहिका, मदत केंद्र यांसारख्या बाबींचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिल्या. तसेच, धरण पाणी पातळी, पूरपातळीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने समन्वय ठेवावा. तालुकास्तरीय शोध व सुटका पथके तयार ठेवावीत. प्रत्येक गावात एक आपदा मित्र तयार करावा. आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालिम घ्यावी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने साखर कारखाने व अन्य संबंधित कारखान्यांनी सांडपाणी व्यवस्थापनाची आवश्यक कार्यवाही केल्याचे प्रत्यक्ष खात्री करून प्रमाणित करावे, असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्वतयारीची प्रचार प्रसिद्धी करून नागरिकांपर्यंत ती पोहोचवावी. जेणेकरून संभाव्य आपत्ती परिस्थितीत नागरिकांना या उपाययोजनांची माहिती राहील. ग्रामस्तरीय आराखडे अद्ययावत करावेत. निर्लेखनास पात्र धोकादायक इमारतींबाबत सतर्क राहून आवश्यक कार्यवाही करावी. संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये निवारा केंद्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा म्हणाल्या, महावितरणने वीजकपातीची सूचना वेळोवेळी नागरिकांनी द्यावी. तसेच, वीजकपातीमुळे पाणीवितरणावर परिणाम होत असल्याने पाणीपुरवठा विभागाशी समन्वय ठेवावा. महावितरणने त्यांचे गावनिहाय संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत. संभाव्य नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी, असे त्या म्हणाल्या.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिका यासह अन्य महत्त्वाच्या विभागांनी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत विविध घटकांची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांना वेळेवर योग्य माहिती मिळावी यासाठी स्थानिक स्तरावर जनजागृती आणि पूर्वतयारी करावी, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
यावेळी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सच्या वतीने प्रा. महेश कांबळे यांनी पूरस्थितीवर मात करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील 6 गावांचा अभ्यास करण्यात आला असल्याचे आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰






