सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : सद्य:स्थितीत धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोयना धरणाच्या स्टिलिंग बेसिनच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. सदर काम साधारणत: दिनांक 18 मार्च, 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कोयना धरणामधून दिनांक 20 मार्च, 2026 पासून जादा क्षमतेने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या सांगली जिल्ह्यातील लाभार्थी, नदीवरील सिंचन/बिगर सिंचन (पिण्यासाठी व औद्योगिक) ग्राहकांनी आगामी 8 दिवसांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चं. हि. पाटोळे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यामध्ये टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन योजना आहेत. कृष्णा नदीमधून सदर तीनही उपसा सिंचन योजनांसाठी पाणी उचलले जाते. तसेच या योजनांच्या रब्बी व उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून पाण्याची तरतूद केली जाते. तसेच म्हैसाळ योजनेसाठी कोयना व वारणा या धरणातील पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेक पाणी KDPH टप्पा 1 व 2 मधून सोडलेले आहे. तसेच वारणा धरणातून 1770 क्युसेक इतका पाणी विसर्ग सोडण्यात आलेला आहे.
सध्या वाढता उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची/ सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी आहे. दरवर्षी साधारणत: दिनांक 15 मार्चपासून धरणाच्या नदी विमोचकामधून (River Sluice) 1000 ते 1500 क्यूसेक्सने पाणी सोडल्यास व KDPH मधून 2100 क्युसेक असे एकूण 3600 क्युसेक कोयना धरणातून विसर्ग सोडण्यात येत असतो. परंतु, सद्य:स्थितीत धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोयना धरणाच्या Stilling Basin च्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. सदर काम साधारणत: दिनांक 18 मार्च, 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामामुळे कोयना धरणाच्या नदी विमोचकामधुन 1000 ते 1500 क्युसेक विसर्ग सोडता येवू शकत नाही. सदर अधिकचा 1500 क्युसेकचा विसर्ग नदी विमोचकामधून न मिळाल्यामुळे फक्त KDPH मधून 2100 क्युसेकने नदीपात्रात सोडण्यात येतो.
यानंतर प्रथम टप्प्यात कोयना नदीच्या कोयना धरणापासून कृष्णा नदी संगमापर्यंत कोयनेच्या सिंचन क्षेत्र/ पिण्याच्या पाणी पुरवठा योजना, उद्योगांस लागणारा पाणी पुरवठा याकरिता पाणी वापर करण्यात येतो. तसेच संगमानंतर टेंभू बॅरेजपर्यंत या भागातील सिंचन व औद्योगिक व पिण्यासाठीच्या गरजा तसेच टेंभू उपसा सिंचन प्रकल्पसाठी उचलावे लागणारे पाणी इत्यादिसाठी पाणी वापर होतो. यापुढे ताकारी योजनेसाठी साटपेवाडी बंधाऱ्यावरील सिंचनासाठी, या भागातील सिंचन/ बिगर सिंचनासाठी लागणारे पाणी यासाठी पाणी वापर होत असतो. या नंतरच्या टप्प्यांमध्ये कृष्णा नदीवरील बंधारे (बहे, वसगडे, डिग्रज) तसेच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी म्हैसाळ को.प.बंधारा, राजापूर को.प.बंधारा या भागासाठी सिंचन व बिगरसिंचनासाठी लागणारे पाणी या सर्व गरजा या कोयना धरणातून सोडलेला 2100 क्यूसेक्स विसर्ग व वारणेतून येणाऱ्या 1770 क्यूसेक्सपैकी दानेाळी बंधाऱ्यातून प्रत्यक्ष मिळणाऱ्या 800 क्यूसेक्स इतक्याच विसर्गावर पिण्यासाठी, नदीवरील सिंचन, औद्योगिक व उपसा सिंचन योजनांसाठी लागणारे पाणी इत्यादी गरजा भागवाव्या लागत आहेत.
उपरोक्त परिस्थिती व कोयना Stilling Basin दुरुस्तीमुळे धरणातील मर्यादीत विसर्गामुळे टेंभू, ताकारी व म्हैसाळ या तीनही योजनांचे पंप हे मर्यादित संख्येमध्ये सध्या चालू आहेत. सद्य:स्थितीत पंपगृह टप्पा 1 मध्ये टेंभू योजनेचे 16 पंप, ताकारी योजनेचे 8 ते 10 पंप व म्हैसाळ योजनेचे 13 ते 14 पंप अशा प्रकारे टेंभू योजनेचे 53 टक्के, ताकारी योजनेचे 63 टक्के व म्हैसाळ योजनेचे 50 टक्के इतके पंप सुरु आहेत. साधारणत: दि. 18 मार्च, 2026 पर्यंत कोयना धरणाच्या Stilling Basin चे दुरुस्ती चे काम झालेनंतर दि. 19 मार्च, 2026 पासून कोयनेच्या नदी विमोचकामधुन आवश्यकतेप्रमाणे 1000 ते 1500 क्यूसेक्सने विसर्ग सुरु करण्यात येत असून त्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये टेंभू, ताकारी व म्हैसाळ या योजना पूर्ण क्षमतेने चालवून उर्वरित उन्हाळी हंगामामध्ये पंप पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे नियोजन आहे.
तरी टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनांच्या सांगली जिल्ह्यातील लाभार्थी, नदीवरील सिंचन/बिगर सिंचन (पिण्यासाठी व औद्योगिक) ग्राहकांनी आगामी 8 दिवसांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


