सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून सात विविध पुरस्कार दिले जातात. सदर अर्ज स्वीकारण्यासाठी 15 मार्च, 2026 ची कालमर्यादा आहे. या अनुषंगाने पुरस्कारांचे अर्ज स्वीकारणेसाठी दि. 14 व 15 मार्च या शासकीय सुट्टिच्या दिवशी कार्यालय कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येत आहे. तरी सर्व नमूद कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचया वतीने समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार असे सात पुरस्कार देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. शासनाने सन 2024-25 व सन 2025-26 या वर्षातील सात पुरस्कारासाठी अर्ज मागविलेले आहेत.
पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी शासन स्तरावरून देण्यात आलेली विहित कालमर्यादा दि. 15 मार्चपर्यंत आहे. मात्र, मार्च 2026 मधील दि. 14 मार्च, शनिवार व दि. 15 मार्च रविवार हे शासकीय सुट्टीचे दिवस आहेत. या पार्श्वभूमिवर या दोन्ही शासकीय सुट्टीच्या दिवशीही पुरस्कारांचे अर्ज स्वीकारणेसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सांगली हे कार्यालय कार्यालय स. 9.45 ते सायं.6.15 पर्यंत या कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.
तरी सांगली जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली (पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगांव रोड, सांगली) या कार्यालयाकडे दिनांक 15 मार्च 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


