सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत उद्योजकांशी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. सांगली मिरज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन एमआयडीसी मिरज येथे आयोजित या बैठकीस जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, तसेच, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, सांगली मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील, संचालक संजय अराणके उद्योजक सर्वश्री सचिन पाटील, यशोधन फडके, बीपीसीएलचे बीपीसीएलचे सिब्नीथ राणा यांच्यासह एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.
औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅससंदर्भात उद्योजकांनी प्राधान्यक्रम ठरवून त्यांना लागणाऱ्या एलपीजीबाबतची माहिती जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा प्रशासनास द्यावी. त्यानुसार तातडीने शासन दरबारी उद्योजकांच्या अडचणी मांडून त्या सोडविण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल, असा दिलासा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी उद्योजकांना दिला.
जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी म्हणाल्या, उद्योजकांनी उत्पादकतेनुसार प्राधान्यक्रम ठरवून कोणत्या गोष्टीसाठी एलपीजीची नितांत गरज आहे, त्यानुसार माहिती द्यावी. त्याचबरोबर गॅस टंचाईवर मात करण्यासाठी उद्योजकांच्या काही सूचना असतील तर त्यांनी मांडाव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी वसंतदादा इंडस्ट्रीजचे सचिन पाटील, हिंदुस्थान नायनॉलचे संजय अराणके, महाबळ, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत यांच्यासह अन्य उद्योजकांनी त्यांच्या अडचणी मांडून सध्या अडचणीच्या काळात उद्योग सुरू रहावेत यासाठी गॅसचा योग्य पुरवठा करण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी. तसेच, प्रशासनाने पीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन उद्योजकांनी केले. उद्योजकांनी सांगितले की, ज्या जुन्या ऑर्डर आहेत त्या पूर्ण करून देणे महत्त्वाचे आहे. ऑर्डर पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा ग्राहक मिळणार नाहीत. प्रायोरिटी सेक्टर मधील थोडासा हिस्सा उद्योगांनाही द्यावा अशी मागणी सर्व उद्योजकांनी केली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





