सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत भागभांडवली अंशदानाचे निधीतून १ लाख रूपये पर्यंत एकूण प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. ही योजना महामंडळाच्या भागभांडवली अंशदानाच्या निधीतून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्ज मागणी अर्ज दिनांक 23 मार्च 2026 पर्यंत वितरीत करण्यात येणार असून 25 मार्च 2026 पर्यंत कर्ज मागणी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
ही योजना मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील व्यक्तिंकरिता राबविण्यात येत आहे. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादिग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा यांचा समावेश आहे.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेंतर्गत महामंडळाने सांगली जिल्ह्यासाठी 50 इतके भौतिक उद्दिष्ट निश्चित केले असून प्रती युनिट 85 हजार रूपये प्रमाणे एकूण बीजभांडवल निधी 42 लाख 50 हजार रूपये, प्रती युनिट 10 हजार रूपये प्रमाणे एकूण अनुदान निधी 5 लाख रूपये तर लाभार्थी सहभाग प्रती युनिट 5 हजार रूपये प्रमाणे एकूण 2 लाख 50 हजार रूपये आहे.
दिनांक २५ मार्च २०२६ नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. तसेच, लाभधारकाने कर्ज प्रस्ताव स्वत: कार्यालयात दाखल करावा. त्यासाठी कोणतेही मध्यस्थ नेमलेले नाहीत, असे प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.


