सांगली, दि. १ (जि. मा. का.) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इतरांसाठी जगले. त्यांनी प्रत्येक समाजासाठी लढा दिला. वाटेगाव येथील प्रस्तावित जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नियोजित स्मारक लवकरात लवकर उभे राहून हा परिसर माणसांनी फुललेला दिसेल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले.
वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, वाळवा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार सचिन पाटील, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मेघराज भाते, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुजित भांबोरे, सम्राट महाडिक, वाटेगावच्या सरपंच नंदाताई चौगुले, उपसरपंच सोनाली पाटील, ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी भारती, सचिन साठे, मोहन साठे आदी उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नियोजित सुंदर स्मारक उभारण्यासाठी प्रस्तावित असलेल्या वाटेगाव येथील तलावाच्या ठिकाणाच्या गटांची मोजणी लवकर करण्यासाठी जिल्हा प्रशासनास निर्देश दिले असून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय केला जाणार नाही. स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. स्मारक उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
प्रारंभी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वाटेगाव येथील तलावाशेजारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी प्रस्तावित असलेल्या जागेची पाहणी करून त्याबाबत जिल्हाधिकारी अशोक काकडे व संबंधित यंत्रणेंकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी वाटेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व तेथील शिल्पसृष्टीची पाहणी केली.
प्रास्ताविकात सचिन साठे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल यांच्या सविस्तर माहिती दिली. स्मारकासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्यांच्या उंचीला शोभेल असे स्मारक व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमास वाटेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰