सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : बालदिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबरपासून बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून बालकामगार प्रथा रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येणार असून, सांगली जिल्ह्यातील सर्व हॉटेल, दुकाने, चहाच्या टपऱ्या, गॅरेज तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांच्या मालकांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 मधील तरतुदीनुसार 14 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे, तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना प्रतिबंधित उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. मालक अथवा नियोक्त्याने 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास २० हजार ते ५० हजार रुपये दंड किंवा सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिक ठिकाणी बालकामगार किंवा प्रतिबंधित उद्योग व प्रक्रियांमध्ये 14 ते 18 वयोगटातील मुले कामावर ठेवल्याचे निदर्शनास किंवा आढळल्यास तात्काळ सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली दूरध्वनी क्रमांक ०२३३-२९५०११९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


