सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत आवास प्लस सर्वेक्षण 2024 मध्ये सांगली जिल्ह्यातील 95 हजार 648 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यातील कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी स्वातंत्र्यदिनी येत्या 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये आवास प्लस सर्वेक्षण 2024 ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून बेघर व कच्चे घर असणाऱ्या कुटुंबांचे ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मार्फत एकूण 95648 कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी काही कुटुंबांची तालुका स्तरावरून चेकर नेमून नमुना पडताळणी करण्यात आली. कुटुंबांची मसुदा प्रतीक्षा यादी तालुकास्तरावर प्राप्त झालेली असून ती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीस दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये मान्यता देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांची संख्या खालीलप्रमाणे:- तालुका व सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे – आटपाडी – ६८३८, जत – २३०७२, कडेगाव – ५८१२, कवठेमहांकाळ – ६९१४, खानापूर – ४१५४, मिरज – १०९५३, पलूस – ६९२१, शिराळा – ९८६०, तासगाव – ८७५३, वाळवा – १२३७१, एकूण – ९५६४८.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी आवास प्लस प्रणालीद्वारे डिलिशन मॉड्यूल कार्यवाही पूर्ण झाली असून आता ग्रामसभा कार्यवाही आणि प्राधान्य यादी (PWL) अंतिम करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.
दि. १५ ऑगस्ट, २०२६ रोजीच्या ग्रामसभेमध्ये अजेंड्यामध्ये कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (PWL) अंतिम करावी. मसुदा प्रतीक्षा यादी ग्रामसभेसमोर सादर करून लाभार्थ्यांच्या पात्रतेची Fact based पडताळणी करावी. ग्रामसभेने सूचविलेल्या लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये (Beneficiary Facts) सर्व शिफारसी व बदलांची आवश्यक सुधारणा करावी. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी (Final PWL) तयार करावी, अशा सूचना देण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


