yuva MAharashtra भिलवडीत चिमुकल्या वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी; "विठ्ठल नामाची शाळा" उपक्रमाने अवघी नगरी झाली पंढरीमय!

भिलवडीत चिमुकल्या वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी; "विठ्ठल नामाची शाळा" उपक्रमाने अवघी नगरी झाली पंढरीमय!



भिलवडी | प्रतिनिधी ,  दि. २६ जुलै २०२६

"विठ्ठल विठ्ठल विठ्ठला... हरी ओम विठ्ठला... ज्ञानोबा माऊली तुकाराम..." या अखंड नामघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या साक्षीने भिलवडी नगरी शनिवारी विठ्ठलमय झाली.

 आषाढी एकादशीच्या निमित्ताने भिलवडी शिक्षण संस्थेच्या डॉ. प्रकाश गोसावी बालवाडी व खाजगी मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "बालवारकऱ्यांच्या दिंडी" उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या भक्तिमय वातावरणामुळे काही काळ भिलवडीतच पंढरपूर अवतरल्याचा भास उपस्थितांना झाला.



कार्यक्रमाच्या प्रारंभी सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतीक पाटील यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या हस्ते हनुमान मंदिरात श्री विठ्ठलाची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.



भिलवडी ग्रामपंचायतसमोरील व्यासपीठावर विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीवर आधारित नृत्य, अभंग, नाट्यप्रकार आणि सांस्कृतिक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त, संचालक, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिंडीचा मार्ग भिलवडी ग्रामपंचायत, मेन रोड, बाहेरील गल्ली, स्वामी समर्थ महाराज मठ, महादेव मंदिर, पाटील गल्ली, राम मंदिर ते हनुमान मंदिर असा होता. 

रिंगण सोहळ्याला उपस्थितांची उत्स्फूर्त दाद

सजवलेली पालखी, माऊलींचा अश्व, विठ्ठल-रुक्मिणी, संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील चिमुकले विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चौकाचौकात महिला व ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून दिंडीचे स्वागत केले, तर हनुमान मंदिर परिसरात बालवारकऱ्यांनी सादर केलेल्या रिंगण सोहळ्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.




यावेळी बोलताना बाळासाहेब मोरे यांनी, वारकरी परंपरा आणि संस्कृती जपणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तर संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असून त्याला भिलवडीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सुचेता कुलकर्णी यांनी केले. शेवटी ग्रामपंचायत भिलवडी व नागरिकांच्या वतीने उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

  🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰