पलूस , दि. २१ : "योग ही केवळ व्यायामपद्धती नसून शरीर, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यास केल्यास निरोगी, आनंदी आणि तणावरहित जीवन जगता येते," असे प्रतिपादन आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक व प्रसिद्ध योग अभ्यासक डॉ. राजन कामत यांनी केले.
पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुल, पलूस येथे "Yoga for Healthy Ageing – निरोगी वृद्धत्वासाठी योग" या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे होते.
यावेळी उपाध्यक्ष विश्वास रावळ, मुख्याध्यापक आनंदराव सावंत, कुमार शिंदे, सुग्रीव बुचडे, विजय कांबळे, बळीराम पोतदार, सुरेश जाधव, अविनाश चव्हाण तसेच शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. राजन कामत यांनी योगाचे वैज्ञानिक महत्त्व, मानसिक स्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि दैनंदिन जीवनातील योगाची उपयुक्तता याविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि तणावपूर्ण जीवनशैलीपासून दूर राहून योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा नियमित सराव करावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे यांनी विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनासाठी योगाचा अंगीकार करावा, असे सांगितले. मुख्याध्यापक आनंदराव सावंत व क्रीडा शिक्षक संदीप सावंत यांनीही योगाचे महत्त्व विशद केले.
यावेळी ऑनलाईन योगाभ्यास सलग ४०० दिवस पूर्ण केल्याबद्दल प्रज्ञा बिराज, स्मिता साळुंखे, सायली मेरू, संदीप सावंत आणि सुनील पुदाले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व योगाभ्यासाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक बळीराम पोतदार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रज्ञा बिराज यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुनील पुदाले यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब चोपडे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ केली.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



