yuva MAharashtra सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 ; मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रंगीत तालीम

सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-2026 ; मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रंगीत तालीम



        सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६ ची मतमोजणी सोमवार, दि. २२ जून रोजी होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे सकाळी ८ वाजता मतमोजणी होणार असून, त्याची रंगीत तालीम निवडणूक निरीक्षक डॉ. अमित सैनी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचा बारकाईने आढावा घेऊन निवडणूक यंत्रणेची सज्जता तपासण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आणि नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.

 





            मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असून मतमोजणीसाठी एकूण पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक आणि एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दोन मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि दोन शिपाई कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय रांग अधिकारी, हौद अधिकारी आणि टॅब्युलेशन पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

 

            रंगीत तालीमेदरम्यान मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था, मतपेट्यांच्या हाताळणीचे नियम, मतपत्रिकांची तपासणी, मतमोजणी टेबलांची मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच निकाल संकलन प्रक्रियेची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

 

            यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी मतमोजणी प्रक्रियेतील विविध बाबींच्या पूर्व तयारीची माहिती सादर केली.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰