yuva MAharashtra विकसित भारत जी राम जी बाबत जिल्ह्यात आजपासून जनजागृती अभियान - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

विकसित भारत जी राम जी बाबत जिल्ह्यात आजपासून जनजागृती अभियान - जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष



 

            सांगली, दि. 29 (जि. मा. का.) : ग्रामीण विकास व ग्रामस्वराज्य अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम (मनरेगा) ऐवजी 'विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, 2025 (VB-GRAM G Act, 2025)' लागू केला आहे. या नवीन अधिनियमाच्या तरतुदी, लाभ, नागरिकांचे हक्क आणि ग्रामीण विकासातील योगदान याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी सांगली जिल्ह्यात 29 जून ते 10 जुलै 2026 या कालावधीत विशेष प्रचार व प्रसार अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

 

विशेष जनजागृती अभियान


            29 जून पासून "समज-गैरसमज (Myth vs Fact)" आणि "रोजगारापासून मालमत्ता निर्मितीकडे" या विषयावर माध्यम संवाद, माहितीपत्रक वितरण आणि प्रसार माध्यमांतून प्रचार केला जाणार आहे.

            30 जून ते 1 जुलैदरम्यान "हक्क संरक्षण प्रतिज्ञा दिन" साजरा करून गावपातळीवर सामूहिक प्रतिज्ञा, फलक व बॅनर प्रदर्शन आयोजित केले जाईल.

            2 ते 3 जुलैदरम्यान "विकसित भारत ग्राम संवाद" या उपक्रमांतर्गत ग्रामसभा, चौपाल आणि गावस्तरीय बैठकीत रोजगाराचा हक्क, मजुरी प्रक्रिया, बेरोजगारी भत्ता आणि नियोजन प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले जाईल.

            6 ते 7 जुलैदरम्यान "अहिंसेपासून हक्कांपर्यंत" या विषयावर शाळांमध्ये चित्रकला, उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, चित्रप्रदर्शन आणि रोजगार हक्क जनजागृती रॅली आयोजित केली जाईल.

            8 ते 9 जुलैदरम्यान "पंचायतराज प्रतिनिधींशी संवाद – नवीन अधिनियम समजून घेऊया" या कार्यक्रमांतर्गत तालुका स्तरावर चर्चासत्रे घेऊन नवीन अधिनियमाची माहिती दिली जाईल.

            10 जुलै रोजी "विकसित भारत कामगार सन्मान कार्यक्रम" अंतर्गत तालुका व जिल्हास्तरावर किमान 100 दिवस रोजगार पूर्ण केलेल्या कामगारांचा सत्कार करण्यात येईल. तसेच मनरेगातील अनुभव आणि नवीन अधिनियमाबाबतच्या अपेक्षा कामगारांकडून व्यक्त करण्यात येणार आहेत.

             सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, स्वयं सहाय्यता गट, युवक मंडळे, आशा सेविका, महिला बचत गट, शेतकरी, मनरेगा कामगार आणि नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम, २०२५ विषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी व उपलब्ध लाभांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष  यांनी केले आहे.


 🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰