सांगली, प्रतिनिधी :
वडिलांच्या वर्षश्राद्धाचा विधी केवळ पारंपरिक पद्धतीने न साजरा करता त्याला सामाजिक बांधिलकीची आणि पर्यावरण संवर्धनाची अर्थपूर्ण जोड देत सांगलीतील ॲड. अभिषेक खोत यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शिक्षण, गरजूंना मदत आणि वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
माळवाडी (ता. पलुस) येथील ‘क्षितिज अभ्यासिका’ मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. मात्र, वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे त्यांना रात्री अभ्यास करणे अत्यंत कठीण जात होते. ही अडचण त्यांचे मित्र व विक्रीकर अधिकारी श्री. संतोष चव्हाण यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलेवर ॲड. खोत यांनी अभ्यासिकेला इन्व्हर्टर भेट दिला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा अभ्यास ज्ञानदीपाप्रमाणे अखंडित सुरू राहणार असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.
खंडोबाचीवाडी (ता. पलुस) येथील शाळेत प्रिंटर नसल्यामुळे शिक्षकांना साध्या प्रिंट किंवा झेरॉक्ससाठी २ किलोमीटर अंतर पार करावे लागत होते. ही समस्या कायमची दूर करत ॲड. खोत यांनी शाळेला प्रिंटर भेट दिला. यामुळे शिक्षकांचा वेळ वाचून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यामुळे शाळेला तांत्रिक बळ मिळाल्याची भावना तेथील शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
वर्षश्राद्धाच्या दिवशी त्यांनी सांगली येथील सावली बेघर निवारा केंद्रातील अनाथ लोकांना गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमामुळे गरजू वृद्ध आणि निराधारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
वडिलांचे निधन वयाच्या ६४ व्या वर्षी झाल्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ येत्या पावसाळ्यात ६४ फळझाडे लावण्याचा संकल्प ॲड. खोत यांनी केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम दीर्घकालीन लाभदायक ठरणार आहे.
विशेष म्हणजे, ॲड. अभिषेक खोत यांनी वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळीही पर्यावरणाची जाणीव जपली. नदी प्रदूषण टाळण्यासाठी त्यांनी वडिलांच्या अस्थींचे नदीत विसर्जन न करता, आपल्या शेतात खड्डा खोदून त्यात वडिलांच्या अस्थी विसर्जित केल्या आहेत. तसेच त्यावर नारळाचे झाड लावले आहे. आजही ते झाड डोलताना दिसते आणि वडिलांच्या स्मृतींना जिवंत ठेवत आहे.
"वडिलांच्या आठवणी कायम राहाव्यात आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ पोहोचावा, या भावनेतून मी हे प्रयत्न केले आहेत. केवळ परंपरा पाळण्यापेक्षा त्यातून समाजोपयोगी कार्य घडवणे हीच खरी श्रद्धांजली आहे."... ॲड. अभिषेक खोत
ॲड. अभिषेक खोत यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, परंपरेला सामाजिक आणि पर्यावरणपूरक दृष्टी देण्याचा हा आदर्श इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰







