- अभियान केवळ कागदावर न राहता आपल्या कृतीत उतरवा
- पाणी वाया जाणार नाही याची काळजी घेणे ही काळाची गरज
❤️ ERTIGA Facilities👇👇👇👇👇👇👇➡️ Touchscreen infotainment system & MUSIC SYSTEM➡️ AIR BAGS➡️ CHILLED AC
सांगली, दि 20 (जि. मा. का.) : पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेती, उद्योग व पिण्यासाठी पाणी मिळावे, हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात येत आहे. जलव्यवस्थापन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने जलव्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. यासाठी सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून जलव्यवस्थापन करावे. हे अभियान केवळ कागदावर न राहता आपल्या कृतीत उतरावे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 अंतर्गत सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने संगमेश्वर घाट, हरिपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, हरिपूरच्या सरपंच राजेश्वरी तांबवेकर, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, काशिनाथ मासाळ, प्रज्ञा पाटील, हर्षल यादव आणि राजन डवरी, जिल्हा परिषद सदस्य अरविंद तांबवेकर आदि उपस्थित होते.
आमदार डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जर प्रत्येकाने स्वतःवर बंधन घालून योग्य जलव्यवस्थापन केले तर पाण्याचा मोठा साठा शिल्लक राहील आणि दुष्काळाच्या काळात तो उपयोगाला येईल. शेतकरी, उद्योग, घरात पाणी वापरताना योग्य ती काळजी घ्यावी. यासाठी प्रशासन आणि जनतेने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. महाराष्ट्रात सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी आणि शेतकऱ्यांना पाणी मिळावे, हाच शासनाचा प्रयत्न असून हा एक चांगला उपक्रम असून जनतेच्या हितासाठी काम करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे म्हणाले, पाण्याचे महत्व पटवून देऊन जलव्यवस्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिनांक 15 ते 30 एप्रिल या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026 राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यांतर्गत विविध विभागांच्या सहकार्याने प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत. २५ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीमध्ये 'गोदावरी ते नर्मदा' जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चौंडी अशा दोन ठिकाणी होणार आहे. दिनांक २५ एप्रिल रोजी त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम स्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचा शुभारंभ होणार आहे. ही यात्रा त्र्यंबकेश्वर, संगमनेर मार्गे शिर्डी येथे येणार आहे. चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असून, येथे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ होणार आहे. ही यात्रा चौंडी, अहिल्यानगर मार्गे शिर्डी येथे येईल. या दोन्ही यात्रा शिर्डी, संभाजीनगर, धुळे मार्गे महेश्वर येथे नर्मदा नदीजवळ पोहोचतील. तिथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील पवित्र नद्यांचे जल कलश लोकसहभागातून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते पूजा करून महेश्वर येथे नर्मदा नदीमध्ये अर्पण करण्यात येणार आहे. सांगली येथून कृष्णा व वारणा नदीच्या पाण्याचा जलकुंभ घेऊन मार्गस्थ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा हेतू विषद करून या कार्यक्रमांतर्गत कृष्णा-वारणेच्या पाण्याचा पवित्र कलश शिर्डी येथे जलदिंडीमध्ये पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाचे मोठे कार्य केले आहे. "पाण्याशिवाय शेती नाही आणि शेतीशिवाय जीवन नाही" हे महत्त्व त्यांनी त्या काळात ओळखले होते. त्यांनी अनेक विहिरी, बंधारे आणि घाट बांधले. यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा असे ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृष्णा, वारणा जलकुंभाचे पूजन करण्यात आले व हा जलकुंभ त्यांनी चौंडी ते महेश्वर येथे होणाऱ्या जलदिंडीसाठी पाटबंधारे विभागाकडे सुपूर्द केला. यावेळी अभियंता विशाल कांबळे यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.
सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले. आभार हर्षल यादव यांनी मानले. कार्यक्रमास पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰








