सांगली, १४ मार्च :
सांगली जिल्ह्यात घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अनेक गॅस एजन्सींकडून “गॅस संपला”, “२००० वेटिंग आहे” अशी कारणे देत ग्राहकांना तासन्तास रांगेत उभे केले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याचबरोबर जादा दराने सिलेंडरची विक्री करून काळाबाजार केला जात असल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर दोषी गॅस एजन्सींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत, अशी आक्रमक मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने केली आहे. यासंदर्भात निवासी जिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी घरपोच गॅस सेवा मुद्दाम टाळली जात असून अतिरिक्त पैसे घेऊन घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार केला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पवित्र रमजान महिन्यात आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांसमोर अन्नाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी प्रशासन या प्रकरणात सतर्क असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीच्या नावाने लेखी तक्रार दिल्यास तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष न दिल्यास संपूर्ण सांगली जिल्ह्यात तीव्र आणि आक्रमक लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




