भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) :
भिलवडी येथील अमोल जगन्नाथ मोरे यांना SRU University, राजस्थान यांच्याकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे भिलवडीसह संपूर्ण पलूस तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. मोरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतून “An Experimental Study with Three Different Approaches for Heat Transfer Enhancement in Heat Sink” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. उष्मा वहन (Heat Transfer) कार्यक्षमता वाढविण्यासाठी हिट सिंकमध्ये विविध पद्धतींचा प्रयोगात्मक अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून मांडला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात उपयुक्त व औद्योगिक वापरासाठी मार्गदर्शक ठरणारे हे संशोधन मानले जात आहे.
या संशोधनासाठी त्यांना डॉ. संजीव कुमार व डॉ. संदीप कोरे यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.
डॉ. मोरे सध्या All India Shri Shivaji Memorial Society Institute of Information Technology, पुणे येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेली ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
डॉ. मोरे यांच्या या यशामुळे भिलवडीच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




