- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा
सांगली, दि. 14 : केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांतर्गत शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवावी व जास्तीत जास्त लाभार्थींना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना खासदार विशाल पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
सद्यस्थितीमध्ये आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमिवर जिल्ह्यात एलपीजी सिलेंडर वितरण, इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन खासदार विशाल पाटील म्हणाले, योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी किंवा शासन स्तरावरील निकषांबाबत काही अडचणी असल्यास या बाबत संबंधित विभागांनी सूचना कराव्यात, याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी विविध केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या बैठकीत दिलेल्या सूचनांवर संबंधित यंत्रणांनी प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी दिल्या.
यावेळी खासदार विशाल पाटील यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय कृषि विकास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा अग्रणी बँक, कृषि, समाजकल्याण, वैद्यकीय महाविद्यालय मिरज, महिला व बाल विकास आदि विविध विभागांकडील योजनांचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवर व अशासकीय सदस्य यांनी विविध सूचना मांडल्या. या सूचनांवर बैठकीत सविस्तर चर्चा करून संबंधित यंत्रणांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




