पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे
- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह
· एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची
मुंबई, दि. 14 : पत्रकारितेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चा वापर झपाट्याने वाढत असला तरी एआयला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याची जबाबदारी आणि समाजाचा विश्वास हे पत्रकारितेचे मूलभूत बळ असल्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे, असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी एआयकडे धोका म्हणून न पाहता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन महासंचालक श्री. सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी एआयमुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात होणारे बदल, संधी आणि आव्हाने यावर सविस्तर भाष्य केले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, विश्वस्त देवदास मटाले, अजय वैद्य, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, मानव इतिहासात ज्ञान लोकांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया छपाई तंत्रज्ञानाच्या शोधानंतर मोठ्या प्रमाणावर बदलली. पूर्वी ज्ञान काही विशिष्ट गटांपुरते मर्यादित होते; मात्र छपाईमुळे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यानंतर प्रसारमाध्यमांचा विकास झाला. दूरदर्शन सुरू झाले तेव्हा वृत्तपत्रांना धोका वाटत होता; डिजिटल माध्यमे आली तेव्हा टीव्हीला धोका वाटू लागला. मात्र या सर्व बदलांनंतरही वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवले. भविष्यातही पत्रकारिता टिकेल, मात्र जे काही काम स्वयंचलित होऊ शकते ते एआयमुळे स्वयंचलित होणार हेही वास्तव आहे, असे त्यांनी नमूद केले.
आज पत्रकारितेत एआयचा वापर वाढत आहे. जगात काही ठिकाणी पूर्णपणे स्वयंचलित ‘वन-मॅन न्यूज रूम’ तयार होत असून बातम्यांचे संकलन, लेखन, संपादन, फॅक्ट-चेकिंग आणि पेज लेआउटसारखी कामे एआयच्या साहाय्याने केली जात आहेत. वित्त, क्रीडा आदी अनेक क्षेत्रांतील बातम्या मोठ्या प्रमाणावर स्वयंचलित पद्धतीने तयार होऊ शकतात. त्यामुळे पत्रकारितेतील कामकाजाची पद्धत बदलत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तुमची नोकरी एआय घेणार नाही; पण एआय वापरणारा दुसरा माणूस तुमची नोकरी घेऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी एआय कौशल्ये आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पत्रकारांना एआयचे प्रशिक्षण देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नलिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असल्याचेही श्री. सिंह यांनी यावेळी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानामुळे ज्ञान निर्मिती, प्रसार आणि वापराची संपूर्ण पद्धत झपाट्याने बदलत आहे. पत्रकारितेतील अनेक कामे ही स्वयंचलित होत आहेत. भविष्यातही अनेक कामे स्वयंचलित (ऑटोमेटेड) होणार असली, तरी पत्रकारितेमधून सत्यता मांडण्याची जबाबदारी मात्र मानवी बुद्धिवरच राहणार आहे. त्यामुळे एआयमुळे पत्रकारितेचे स्वरूप बदलणार असले, तरी पत्रकारितेचे मूलभूत बळ म्हणजे विश्वास असून सत्यता, विश्वास आणि संपादकीय जबाबदारी ही पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे कायम राहणार आहेत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
एआयमुळे बातम्या रिअल-टाईम, गतिमान आणि वैयक्तिकृत (हायपर पर्सनलाइज्ड) होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या “अटेन्शन इकॉनॉमी” मध्ये वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या स्वरूपात सामग्री सादर केली जात आहे. काही विदेशी वृत्तसंस्था एकाच बातमीचे अनेक पर्याय तयार करून वेगवेगळ्या वाचकगटांना पाठवतात आणि कोणता प्रकार प्रभावी ठरतो याचा अभ्यास करतात, अशी माहितीही प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी यावेळी दिली.
एआयच्या मदतीने रिअल-टाइम कंटेंट, इन्फोग्राफिक्स आणि व्हिडिओ तयार होत आहेत. त्यामुळे बातम्या ‘लिक्विड’ आणि सतत बदलणाऱ्या स्वरूपात उपलब्ध होत आहेत. माहितीचा वेग प्रचंड वाढला आहे. आज एआयमुळे एक व्यक्ती दिवसाला २०-३० लेख तयार करू शकते. त्यामुळे माहितीचे प्रमाण वाढले असले, तरी त्यातील विश्वासार्हतेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरत आहे, असे श्री. सिंह यांनी सांगितले.
एआयची एक मोठी मर्यादा म्हणजे भारतीय भाषांचे आकलन. एआय तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली तरी त्याला मराठीसह भारतीय भाषांचा संदर्भ पूर्णपणे समजत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. बहुतेक मोठी लँग्वेज मॉडेल्स ही विकिपीडिया, रेडिटसारख्या पाश्चात्त्य स्रोतांवर आधारित असल्याने भारतीय अनुभव, संस्कृती आणि भाषांचा डेटा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र एआय विकास आणि “डेटा सार्वभौमत्व” महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
एआयवर आधारित प्रणाली कधी कधी चुकीची माहिती तयार करतात. ‘हॅलुसिनेशन’मुळे नसलेले संदर्भ किंवा माहिती निर्माण होऊ शकते. न्यायालयीन प्रकरणांमध्येही एआयने चुकीची माहिती दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एआय-निर्मित सामग्रीची जबाबदारी शेवटी संपादकीय स्तरावरच राहते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्री. सिंह म्हणाले की, एआयमुळे माहितीचे प्रचंड प्रमाण तयार होत आहे. डिजिटल माध्यमांमध्ये “एआय स्लॉप” म्हणून ओळखली जाणारी मोठ्या प्रमाणातील हलकी सामग्री तयार होत आहे. त्यामुळे भविष्यात पत्रकारिता दोन भागांत विभागली जाऊ शकते, एक म्हणजे मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सामान्य बातम्या आणि दुसरी म्हणजे संशोधनाधारित, तपासात्मक व दर्जेदार पत्रकारिता.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात एआयचा प्रभावी वापर
एआयमुळे “डिप फेक” सारख्या तंत्रज्ञानाचा धोका वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. खोटे व्हिडिओ तयार करणे सोपे झाले असले तरी खऱ्या व्हिडिओलाही “डिप फेक” म्हणण्याची प्रवृत्ती वाढत आहे. यामुळे सत्यावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एआय आधारित फॅक्ट चेक प्रणाली सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. संशयास्पद व्हिडिओ किंवा माहितीची पडताळणी करून ती खरी की खोटी हे तपासण्याची सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहे.
याशिवाय पश्चिम देशांमध्ये विकसित होत असलेल्या “प्रोव्हेनेन्स” तंत्रज्ञानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, फोटो किंवा व्हिडिओमध्ये विशिष्ट डिजिटल स्वाक्षरी (डीएनए सिग्नेचर) समाविष्ट केली जाते. त्यामुळे मूळ सामग्रीमध्ये कोणताही बदल झाला आहे का हे सहज ओळखता येते. भारतातही अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. सिंह यांनी सांगितले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात एआयचा वापर सुरू झाला आहे. बैठकींचे मुद्दे किंवा माहिती टाकल्यानंतर त्यातून तत्काळ विविध भाषांमध्ये सामग्री तयार करता येते. त्यामुळे सरकारी माहिती आता रिअल-टाइम स्वरूपात प्रसारित करता येत आहे आणि डिजिटल माध्यमांवरील पोहोच मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यावेळी श्री. चव्हाण यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले असून पूर्वी एखादी बातमी करण्यासाठी रिपोर्टर, कॅमेरामन, सहाय्यक आणि चालक अशी अनेकांची टीम लागायची; मात्र आता एकच पत्रकार मोबाईलच्या माध्यमातून चित्रीकरण, लेखन, व्हॉइसओव्हर आणि एडिटिंगसारखी सर्व कामे करू शकतो. तंत्रज्ञानाची ही प्रगती थांबवता येणार नाही, त्यामुळे पत्रकारांनी एआय आणि नवीन साधनांशी जुळवून घेणे आवश्यक आहे. गुगल, ई-मेल, सोशल मीडिया आणि मोबाईल तंत्रज्ञानामुळे संवाद आणि माहितीचा वेग प्रचंड वाढला असून भविष्यात एआयमुळे आणखी मोठे बदल घडणार आहेत. त्यामुळे अशा परिषदांमधून पत्रकारांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान चांगले की वाईट हे त्याच्या वापरावर अवलंबून असते, त्यामुळे एआयचा योग्य आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात श्री. शिर्के यांनी सांगितले की, एआयसारख्या नव्या तंत्रज्ञानाची प्राथमिक ओळख अनेकांना असली तरी त्याचे सखोल ज्ञान अशा परिषदांमधूनच मिळते. त्यामुळे या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणे पत्रकारांसाठी महत्त्वाचे आहे. राज्यात एआयचा वापर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने आग्रही असून शासनाच्या कामकाजातही तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर देत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या पुढाकारामुळे शासनाच्या बातम्या पत्रकारांपर्यंत अधिक वेगाने आणि सुटसुटीत स्वरूपात पोहोचत असल्याचेही त्यांनी सांगितले.
उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे यांनी सूत्रसंचालन केले. प्रधान सचिव श्री. सिंह यांच्या हस्ते परिषदेतील वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




