मुंबई, दि. 4 : राज्यातील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदार, प्रांत, तलाठी, वन संरक्षक अशा अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ले होत आहेत. ही बाब गंभीर असून यापुढे अधिक पोलीस बंदोबस्तासह महसूल आणि पोलीस यांच्यामार्फत संयुक्त मोहीम राबवून अशी कारवाई करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. यासाठी संयुक्त टास्क फोर्स तयार करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
सदस्य समाधान आवताडे यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित पाटील, किशोर पाटील यांनी सहभाग घेतला.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीच्या प्रकरणांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री म्हणाले, अशा प्रकरणांवर प्रतिबंध आणण्याच्या अनुषंगाने तालुका स्तरावर गस्ती पथकाची नेमणूक करुन त्यावर परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकरणांत एकूण १२.४१ कोटी दंड आकारला असून एकूण ६६ प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच एमपीडीए कायद्यानुसार १६ इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर हल्ले झालेली १० प्रकरणे आढळली असून या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.


