yuva MAharashtra गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच - जिल्हाधिकारी अशोक काकडे

गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच - जिल्हाधिकारी अशोक काकडे


-        आगामी 90 दिवस एचपीव्ही मोफत लसीकरण मोहीम

-         जिल्ह्‌यात 22 हजारहून अधिक लसीकरणाचे लक्ष्य



        सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जागतिक स्तरावर कर्करोगाचे आव्हान उभे आहे. या अनुषंगाने गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरण मोहीम महत्त्वाची आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.



विविध लसीकरणाच्या अनुषंगाने स्थापित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा शल्य चिकत्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा नियमित लसीकरण समितीचे सदस्य सचिव डॉ. विजयकुमार वाघ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह आरोग्य विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.




        जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जागतिक महिला दिनाच्या मुहुर्तावर आरोग्य विभागाकडून गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी राष्ट्रीय ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेचा राज्यव्यापी  शुभारंभ करण्यात आला. यामध्ये 14 वर्षे पूर्ण झालेल्या, परंतु 15 वर्षे पूर्ण न झालेल्या वयोगटातील मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या स्तरावर जनजागृती करावी. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांमार्फत घरोघरी जाऊन पालकांचे समुपदेशन करावे. पुढील 90 दिवसांत विविध माध्यमांतून जिल्ह्यातील 14 ते 15 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे व ही मोहीम शंभर टक्के लाभार्थ्यांपर्यंत पोहोचचावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

            एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर पुढील 90 दिवसांच्या कालावधीत 15 वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलीदेखील या तीन महिन्यांच्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेत लसीकरणास पात्र आहेत. या मोहिमेमध्ये सांगली जिल्ह्यातील 18 हजार 416 व सांगली महानगरपालिका क्षेत्रातील 4 हजार 302 मुलींचे लसीकरण करणे अपेक्षित असून लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात होणार आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर (प्राथमिक आरोग्य केंद्र/UPHC), ग्रामीण रुग्णालय/UCHC), उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये अशा शासकीय आरोग्य संस्थांमध्ये हे लसीकरण करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे व सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एचपीव्ही लसीकरण मोहिमेसंबंधीचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.



यावेळी डॉ. विजयकुमार वाघ यांनी या लसीकरण मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. बैठकीत देऊन एचपीव्ही लस सुरक्षित असून, सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, याबाबत प्रयत्न व जनजागृती करण्याबाबत सूचित करण्यात आले.

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰






🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰