भिलवडी दि. ३१ : सांगली जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी जिल्हा परिषद गट व पलूस तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सहकार्य करावे, अशी विनंती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज देशमुख, बाबा संग्रामभाऊ देशमुख व शरदभाऊ लाड यांनी थेट ब्रह्मनाळ येथे भेट दिली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, अशोक पाटील, अण्णा शशिकांत राजोबा सर, पलूस बाजार समितीचे संचालक अनिल राजोबा, रोहित पाटील, मनोज पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान बोलताना भाजप नेते पृथ्वीराज देशमुख म्हणाले, “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी हितासाठीचे काम अत्यंत मोठे आहे. गेल्या २४ वर्षांपासून संदीप राजोबा, सूर्यकांत मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. या निवडणुकीत आम्हाला सहकार्य करावे, आम्हीही पुढील काळात तुम्हाला खंबीर साथ देऊ,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
यावर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे म्हणाले की, “माजी खासदार राजू शेट्टी साहेब तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर जो निर्णय होईल, तो निर्णय आपणास कळविण्यात येईल.”
या भेटीमुळे भिलवडी गट व पलूस तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰





