- बाधित शेतीपीक, फळपिकांचा नुकसानभरपाईचा अहवाल सादर
- घरांची पडझड, गोठा नुकसानीच्या अनुषंगाने अनुदान वितरण सुरू
- भांडी, कपडे नुकसानभरपाईपोटी 1276 बाधितांना अनुदान वाटप सुरू
सांगली, दि. 11 (जि. मा. का.) : ऑगस्ट 2025 मध्ये सांगली जिल्ह्यात उद्भवलेली पूरपरिस्थिती पाहता, शेतीपिके व फळपिके, घर पडझड, गोठ्याचे नुकसान, व्यावसायिकांची दुकाने, गॅरेज, तसेच घरात पाणी शिरुन भांडी व कपड्याचे नुकसान झालेले आहे. या नागरिकांच्या पाठिशी शासन व प्रशासन असून, पंचनामे व नुकसानभरपाईची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ऑगस्ट 2025 मध्ये जिल्ह्यात उद्भ वलेल्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शेतीपीक व फळपीक पंचनामे करून अहवाल सादर करण्यात आला आहे. घरांची पडझड व गोठ्यांच्या नुकसानीच्या अनुषंगाने तालुका स्तरावर पंचनामे करण्यात आले असून, बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मूल्यांकनाचे आधारे अनुदान वितरण करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतीपीक व फळपिकाचे पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये फळपीक सोडून बागायती पिकाखालील बाधित क्षेत्र 4048.01 हेक्टर असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 13 हजार 339 आहे. नुकसान भरपाईपोटी 7 कोटी 38 लाख 72 हजार रुपये अपेक्षित आहे. फळपिकाखालील बागायत क्षेत्र 26.26 हेक्टर असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 136 आहे. त्यासाठी 6 लाख 65 हजार रुपये नुकसान भरपाईपोटी अपेक्षित आहेत. असे एकूण बाधित 4074.21 हेक्टर क्षेत्र असून बाधित शेतकऱ्यांची संख्या 13 हजार 475 आहे. यासाठी नुकसान भरपाईपोटी एकूण 7 कोटी 45 लाख 37 हजार 900 रुपयांच्या निधीची मागणी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे. फळपीक सोडून जिरायत पिकाखालील बाधित क्षेत्र निरंक आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, घरांची पडझड व गोठ्याच्या नुकसानीच्या अनुषंगाने तालुका- स्तरावर पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये 7 अंशत: पक्की घरे, 82 अंशत: कच्ची घरे व एका गोठ्याचे नुकसान झाले आहे. बांधकाम विभागाकडून प्राप्त होणाऱ्या मूल्यांकनाच्या आधारे अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात 839 इतके दुकानदार, गॅरेज, टपरीधारक यांचे नुकसान झालेले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम तालुकास्तरावर सुरू आहे. या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच शासनाकडे अनुदान मागणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात घरात पाणी शिरुन 1276 इतक्या बाधितांचे भांडी व कपड्याचे नुकसान झालेले असून त्यांच्या प्राप्त झालेल्या पंचनाम्याचे आधारे अनुदान वाटप करण्याची कार्यवाही चालू आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


