कडेगांव दि.०९ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पलूस कडेगांव विधानसभा क्षेत्र यांच्यावतीने कडेगाव तालुक्यासह परिसरात गोवंश हत्या बंदी कायद्याचा चुकीचा वापर करून गोरगरीब जनावरांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यावर अन्याय करणाऱ्या गोरक्षकांवर कायदेशीर कार्यवाही करावी या मागणीचे निवेदन आरपीआयचे पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष विशाल तिरमारे यांच्या नेतृत्वाखाली कडेगांव चे तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले.यावेळी आरपीआयचे विधानसभा उपाध्यक्ष शितल मोरे, कडेगांव तालुका उपाध्यक्ष आप्पा मिसाळ,कार्याध्यक्ष रोहित गुजर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना विशाल तिरमारे म्हणाले की, कडेगांव तालुक्यात व इतर भागात गोवंश हत्या बंदी कायद्याच्या नावाखाली काही तथाकथित गोरक्षक जनावरांचा व्यापार करणाऱ्या लोकांवर अन्याय करीत आहेत.यामध्ये जनावरांच्या गाड्या आडवीने, तसेच गाडीमधील जनावरे घेऊन जाणे, प्रशासनाचा धाक दाखवून व्यापार करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणे व धमकावणे व्यापार करण्यास मज्जाव करणे असे प्रकार सुरू आहेत. गोरक्षकांच्या भीतीने व्यापारी वर्ग भयभीत व चिंतेत आहेत. सातत्याने गोवंश बंदी कायद्याच्या नावाखाली गोरगरीब व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. व्यापार बंद पडल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मोठा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे.
प्रशासनाने यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा व जनावरांचा व्यापार करणारे व गोरक्षक यांची मिटिंग बोलवून मार्ग काढावा तसेच जाणीवपूर्वक अन्याय करणाऱ्या गोरक्षावर कार्यवाही करावी तसेच गोवंश हत्या बंदी कायदा रद्द करावा अशी आमच्या रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे.सदर विषयासंदर्भात येत्या काळात पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी साहेब, सांगली, जिल्हा पोलिस प्रमुख, सांगली, कडेगांव पोलिस ठाणे,कडेगांव, चिंचणी वांगी पोलिस ठाणे, वांगी यांना देण्यात आल्या आहेत.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰