भिलवडी । प्रतिनिधी दि. ८ ऑगस्ट २०२५ :
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस स्व.आनंदराव (भाऊ) मोहिते यांचा प्रथम पुण्यस्मरण रविवार दिनांक १० ऑगस्ट संपन्न होत असून, भिलवडी येथे त्यांच्या गावी सकाळी ९ वा. भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी भिलवडी व परिसरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. "कोण होईल उद्याचा कीर्तनकार" या सोनी मराठीवरील मालिकेचे उपविजेते युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर माने हेरवाडकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून सायंकाळी स्वरगंधा महिला भजनी मंडळ आणि भुवनेश्वरी महिला भजनी मंडळ यांची कीर्तनसेवा सादर करण्यात येणार आहे.
स्व.आनंदराव (भाऊ) मोहिते यांनी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. त्यांनी राज्यातील खेड्यापाड्यात जाऊन काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून भिलवडीतील मुख्य बाजारपेठेत त्यांच्याशी संबंधित फलक लावण्यात आले आहेत. आयुष्यभर काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन एकनिष्ठ पणाने मार्गक्रमण करणारे ते काँग्रेसचे सच्चे सैनिक होते, स्व.डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या सुरुवाती पासूनच्या राजकीय जीवनात भाऊंनी साहेबांना नेहमीच साथ दिली, जिल्ह्याच्या राजकारणातील ऋषितुल्य असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत आधार वृद्धाश्रम, (आष्टा) आणि सावली बेघर निवारा केंद्र (सांगली) येथे जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. भिलवडी मध्ये आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं असून
या पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भिलवडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰