yuva MAharashtra सर्व विभागांच्या समन्वयातून कृषि निर्यातीस चालना देणार - जिल्हाधिकारी अशोक काकडे

सर्व विभागांच्या समन्वयातून कृषि निर्यातीस चालना देणार - जिल्हाधिकारी अशोक काकडे

 - कृषिमाल निर्यात मार्गदर्शन कार्यशाळेचे आज आयोजन

- शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 





        सांगलीदि. 11, (जि. मा. का.) : सर्व विभागांच्या समन्वयातून कृषि निर्यातीस चालना देणार आहे. या अनुषंगाने कृषि निर्यातवाढीसाठी  कृषि माल निर्यात मार्गदर्शन एकदिवसीय कार्यशाळेचे मंगळवार, दि. 12 ऑगस्ट रोजी आयोजन केले आहे. जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी 10.30 पासून दिवसभर ही कार्यशाळा होणार असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशा पद्धतीने कार्यशाळेचे नियोजन करण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.

 

            कृषिमाल निर्यात मार्गदर्शन कार्यशाळा नियोजनाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस मिरजचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, कृषि उपसंचालक धनाजी पाटील आदि उपस्थित होते.

 




            जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भारताने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था 'वन ट्रिलियन डॉलर' करण्यासाठी वाटचाल सुरू आहे. या अनुषंगाने महत्वाच्या उद्योगांच्या क्षमता विकसित करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येत आहे. यामध्ये कृषि निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या योजनांची माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागांनी परस्पर समन्वय ठेवून ही कार्यशाळा यशस्वी करावी, असे सूचित करून त्यांनी यावेळी या कार्यशाळेस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

            कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यशाळेस द्राक्ष, डाळिंब, केळी, आंबा व पेरू आदि फळ उत्पादक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कृषि व कृषि पूरक व्यवसाय, सेंद्रिय शेती, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील नियम, यासह जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कर्ज योजना, पशुसंवर्धन, जिल्हा धोरणात्मक आराखडा यांची माहिती या कार्यशाळेत दिली जाणार आहे.

 




            तसेच, जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्याच्या अनुषंगाने विविध योजना, कृषि माल निर्यातवाढीत अपेडाची भूमिका, फळबाग काढणीपश्चात तंत्रज्ञान, कृषि माल प्रक्रिया उद्योगातील संधी, जी. आय. मानांकन प्राप्त पिके व कृषि मालाचे ब्रँडिंग, प्रक्रिया, पॅकेजिंग व मार्केटिंग आदिंच्या अनुषंगाने ही कार्यशाळा महत्त्वाची ठरणार आहे. या कार्यशाळेत उपस्थितांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰