सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भारती हॉस्पीटल सांगली येथे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध व निवारण कायद्याबाबत जनजागृती संबंधित कायदेशीर साक्षरता या कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख वक्त्या भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली च्या प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ. अजित जोशी, डॉ. श्वेता कुलकर्णी, नितीन मुदीराज आदी उपस्थित होते.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे काम कसे चालते याची संपूर्ण माहिती दिली. तसेच कोणास कायदेविषयक अडचणी आल्यास व कोणास न्यायालयातील प्रकरणे चालविण्याकरीता मोफत वकील हवे असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
डॉ. पूजा नरवाडकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध व निवारण कायदा बाबत मार्गदर्शन केले. कायद्याबद्दलची जागरुकता करून दिली. महिलांनी भिती न बाळगता काम करावे व अन्याय सहन न करता निर्भिडपणे अन्यायाची तक्रार विशाखा समितीकडे करण्याबाबत आवाहन केले. विशाखा समितीमधील सदस्य व त्यांची कामे कशा प्रकारची असतात याची माहिती करून दिली. महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे यायला हवे, न घाबरता समाजामध्ये आपले स्थान निर्माण केले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक वैद्यकीय अधिक्षक डॉ. अजित जोशी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्वेता कुलकर्णी यांनी केले. आभार नितीन मुदीराज यांनी मानले.