yuva MAharashtra विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मतदान केंद्रांची संयुक्त भेटीद्वारे केली पाहणी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मतदान केंद्रांची संयुक्त भेटीद्वारे केली पाहणी



 

     सांगली, दि. 10, (माध्यम कक्ष) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी निवडणूक पूर्वतयारी, मतदान केंद्रांवर आश्वासित किमान सुविधा तसेच गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सांगली, मिरज, पलूस कडेगाव, तासगाव विधानसभा मतदार संघांमधील विविध मतदान केंद्रांना संयुक्त भेट देऊन पाहणी केली.



          यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मिरज व तासगाव शहरातील एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणांना भेट दिली. तसेच, सांगली, पलूस – कडेगाव मतदारसंघांतील काही मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची तयारी तसेच, आश्वासित किमान सुविधा अंतर्गत मतदान केंद्रांवर मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच गर्दी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला. यावेळी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, पलूसच्या तहसीलदार दीप्ती जाधव – रिठे यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



         यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आश्वासित किमान सुविधा अंतर्गत मतदान केंद्रांवर पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी व्हीलचेअर, बैठकव्यवस्था, आवश्यक तेथे सावलीसाठी मंडप व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या.


🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰