पलूस दि.६ : भारताचा स्वातंत्र्यलढा हा जगातील एक रोमहर्षक लढा आहे. या इंग्रज विरोधी लढ्यात गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत जे जे लढले ते सर्व क्रांतिवीर आणि त्यांचे कार्य म्हणजे नव्या पिढीची ऊर्जाच आहे. त्यातल्या त्यात आपल्या परिसरातील क्रांतिकारकांची माहिती स्थानिक इतिहास म्हणून विद्यार्थ्यांनी संकलित करावी असे आवाहन पुरोगामी चळवळीतील इतिहास अभ्यासक मारुती शिरतोडे यांनी पलूस येथे केले. पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये क्रांती पंधरवड्या निमित्त आयोजित 'सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे कार्य' या विषयावर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक जयंत कदम होते. तर सभा मंचावर पलूस केंद्राचे केंद्रप्रमुख राम चव्हाण ,मुख्याध्यापिका
जयमाला पाटील उपस्थित होते.
मारुती शिरतोडे यांनी 3 सप्टेंबर 1942 चा शौर्यशाली तासगाव मोर्चा ,10 सप्टेंबर १९४२ चा क्रांतिकारकांचा इस्लामपूर मोर्चा, 24 जुलै 43 सांगली जेल फोडो आंदोलन, शेनोली खिंडीतील रेल्वे लूट इतर काही महत्त्वपूर्ण घटना सांगून क्रांतिकारकांची धाडसी कार्ये मुलांच्या समोर मांडली. यामध्ये क्रांती अग्रणी जी डी बापू लाड ,क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नाईकवडी, पलुसचे क्रांतीवीर कृष्णा रामा कुराडे ,हुतात्मा गोविंदा भरमा वडार ,किर्लोस्करवाडी येथील हुतात्मा उमाशंकर पांड्या ,स्वामी रामानंद भारती, गोविंदराव खोत,कुंडल चे कॅप्टन आकाराम पवार, कॅप्टन रामभाऊ लाड व इतर क्रांतिकारकांच्या धाडसी कार्याची माहिती मुलांना ओघवत्या शैलीत दिली.
प्रारंभी देशभक्तीपर गीत आणि नृत्य मुलांनी सादर केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेतील जागतिक मॅथस ओलंपियाड स्पर्धेत नंबर आलेल्या मुलांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका जयमाला पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अनिता कदम यांनी करून दिला. सूत्रसंचालन जयश्री सावंत यांनी केले तर आभार राजेश्वरी सुतार यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व सुमारे 300 विद्यार्थी उपस्थित होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖