yuva MAharashtra धरणातून विसर्ग वाढविल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नागरिकांनी सतर्क रहावे, घाबरून जावू नये - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा

धरणातून विसर्ग वाढविल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नागरिकांनी सतर्क रहावे, घाबरून जावू नये - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा




 

         सांगली दि. 2 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्याकरीता दि. 2 ऑगस्ट पासून पुढील 5 दिवसाकरीता ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. परंतु सातारा जिल्ह्याकरीता दि. 2 व 3 ऑगस्ट रोजीसाठी रेड अलर्ट आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी 5 च्या स्थितीनुसार वारणा धरणात 29.61 (86 टक्के) तर कोयना धरणात 86.78 (82 टक्के) टी.एम.सी. पाणीसाठा आहे. कोयना धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून 10 हजार क्युसेक्स विसर्ग वाढविल्यामुळे आता एकूण 52 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 11 हजार 532 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणात 55 टक्के पाणीसाठा असून 3 लाख क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पर्जन्यमान, धरणातून विसर्ग यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन व सर्व यंत्रणा सतर्क असून नागरिकांनीही सतर्क रहावे, घाबरून जावू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना मिळताच स्थलांतर करावे, प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, अतिवृष्टी व सततचा पाऊस यामुळे 116 गावे बाधित झाली आहेत. 8556.05 हे.आर इतके पिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य मार्ग 5, प्रमख जिल्हा मार्ग 21 व ग्रामीण मार्ग 11 पाण्याखाली गेले आहेत.  1 ऑगस्ट अखेर एकूण 1 हजार 173 कुटुंबातील 5 हजार 145 स्त्री, पुरूष व लहान मुले स्थलांतरीत झाली आहेत. आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. एक एन.डी.आर.एफ. पथक (30 जवान) दि. 15 जून पासून व एक सैन्य दल पथक (107 जवान) दि. 26 जुलै पासून  जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यांच्या वतीने ठिकठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली आहे.

संभाव्य वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीबाबत सर्व पूर प्रवण तालुके व महानगरपालिका क्षेत्र यांना सतर्क राहण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी पातळी वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच तात्काळ नागरिक व जनावरांचे स्थलांतर करण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाण्याखाली गेलेले रस्ते व पूल या ठिकाणी बॅरिकेट करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. वीज पुरवठा खंडीत झालेल्या ठिकाणी पूराचे पाणी ओसरल्यानंतर तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी महत्वाचे पूल, रस्ते या ठिकाणी पूराचे पाणी पाहण्याकरीता गर्दी होते त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रतिबंधात्मक आदेशही जारी करण्यात आले आहेत. जीवाला धोका पोहचेल असे कृत्य करू नये, असे कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖