BANNER

The Janshakti News

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज .... मुख्य कार्यकारी अधिकारी, तृप्ति धोडमिसे



 पलूस दि. ३१ :  पावसाळा सुरू होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गावा-गावांचा सपर्क तुटणे, वादळ, अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन वीजपुरवठ्याची समस्या निर्माण होऊन उद्भवणार्‍या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी जिल्हातील सर्व यंत्रणा सज्ज आहे, असे  मत सांगली जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ति धोडमिसे यांनी व्यक्त केले. मान्सूनपूर्व तयारीबाबतचा आढावा घेण्यासाठी पंचायत समिती पलूस येथे पूर बाधित गावातील सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
 


 दरम्यान शुक्रवार दि. ३१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ति  धोडमिसे व  जिल्हा परिषद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) शशिकांत शिंदे यांनी पलूस तालुक्यातील पूरबाधित गावांना भेट देवून गावातील लोकांकडून येणाऱ्या पावसाळयामधील संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने माहिती व आढावा घेतला. यावेळी आपत्ती कालीन परिस्थितीमध्ये पूर बाधित गावांमध्ये असलेल्या बोटी / सुरक्षा किट सुस्थितीत आहेत का? याची खात्री केली. तसेच भिलवडी येथे कृष्णा नदीमध्ये स्वतः बोटीमध्ये बसून, त्याबाबतचे प्रात्यक्षिक घेतले. पूर परिस्थिती उदभवल्यास त्यास सक्षमपणे सामोरे जाता येईल अशी तयारी प्रशासनाने केली असल्याचे मत यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारीयांनी व्यक्त केले.


पूरबाधित गावांमध्ये आरोग्य, पशुधन, शासकिय इमारती, धोकादायक इमारती तसेच पिण्याचे पाणी इत्यादी बाबत आढावा घेवून, मार्गदर्शन केले. कोणत्याही गावांत अपरिहार्य कारणाशिवाय, पूरामध्ये बोट सोडण्याची आवश्यकताच भासू नये याकरीता, गावातील लोकांनी पूर परिस्थिती निर्माण होताच, आपले पशुधन व जीवनावश्यक वस्तू घेवून, नियोजित केलेल्या अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे अशा सूचना देवनू, अशी प्रशासनाची अपेक्षा असलेचे मत व्यक्त केले.

गावपातळीवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना महत्वाच्या सुचना

या अनुषंगाने तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची आढावा बैठक पंचायत समिती, पलूस येथे घेण्यात आली. त्यामध्ये गावातील पूरबाधित कुटूंबे व पशुधन यांचा सर्व्हे करून त्याच्या यादयाः अद्यावत करणेत याव्यात, तसेच धोकादायक इमारती असणारी कुटूंबे त्वरीत स्थलांतरीत व्हावीत याकरीता, आपत्ती व्यवस्थापन समिती मार्फत त्वरीत कार्यवाही करावी. गावातील गरोदर माता, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, वय वर्षे ८५ वरील जेष्ठ नागरिक यांना त्वरीत नियोजित ठिकाणी स्थलांतरीत करावे अशा सूचना दिल्या.

तसेच आपत्ती कालीन परिस्थिती हाताळणे सुलभ व्हावे याकरीता, गाव पातळीवर काम करणारे सर्व कर्मचारी यांनी मुख्यालयी रहावे. आपले मोबाईल फोन २४ तास सुरू ठेवावेत. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यास आपत्ती कालीन परिस्थितीत रजा दिली जाणार नाही. आपत्ती कालावधीत दुर्घटना घडल्यास त्यास आपणास जबाबदार धरणेत येवून प्रशासकिय कारवाई करणेत येईल अशा सूचना मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जि.प. सांगली व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली यांनी दिल्या आहेत.

हेही पहा ----


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖