BANNER

The Janshakti News

जिल्‍ह्याच्‍या कारखानदारीचा देशात लौकीक.... खासदार शरद पवार..
======================================
======================================

कुंडल | दि.२८ जानेवारी २०२३

सांगली जिल्‍ह्याच्‍या कारखानदारीचा देशात लौकीक आहे, दरवर्षी राज्‍य व देशस्‍तरावर मिळणा-या पुरस्‍कारांत सांगली जिल्‍ह्यातील कारखाने अग्रभागी असतात. पण अजुनही साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करुन जास्‍तीत जास्‍त शेतक-यांना आर्थिक सक्षम बनवावे, असे प्रतिपादन राष्‍ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी केले.

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड समाधी स्थळाचे लोकार्पण, जन्म शताब्दी सांगता समारंभ , क्रांतदर्शी ह्या जन्म शताब्दी स्मृती अंकाचे प्रकाशन, क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना विस्तारीकरणाचा प्रारंभ शुक्रवारी पलूस तालुक्‍यातील कुंडल येथे झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते.


पवार म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. बापूंचे स्मारक व समाधी स्थळाचे काम उत्कृष्ट झाले आहे.  देशाच्या सहकार चळवळीत  सांगली जिल्ह्यात क्रांती, सोनहिरा व राजारामबापू कारखान्‍यांचा प्राधान्‍याने उल्लेख होतो. याचे श्रेय सभासद, संचालकांना दिले पाहिजे.  स्वातंत्र्य चळवळीत दक्षिण सातारा जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. तत्‍कालीन नेते क्रांतिअग्रणी जी.डी.बापू लाड, क्रांतिसिंह नाना पाटील, वसंतदादा पाटील, राजाराम बापू पाटील, नागनाथअण्‍णा नायकवडी यांनी स्‍वातंत्र्यानंतर सर्वसामान्‍य जनतेला अभिप्रेत असणारा आर्थिक विकास केला. दुष्काळ भाग असला तरी स्वाभिमानाने जगण्याची उर्मी इथल्या माणसांची आहे. त्‍यामुळे पाणी नसलेतरी विविध व्यवसायाच्या निमित्ताने  देशाच्या कानाकोपऱ्यात दुष्काळी भागातील लोक जाऊन सन्मानाने जीवन जगत आहेत. 
या परिसरातील माणसाला या ठिकाणीच स्‍वाभिमानाने जगण्‍यासाठी या नेतृत्‍वाने दुष्काळी भागात पाणी नेण्‍यासाठी पाणी योजना सुरु केल्‍या. साखर कारखानदारी चांगल्‍या पध्‍दतीने चालविली. या भागात विकासाची गंगा आणली त्यांच्या विकासाचा वारसा तरुण पिढी सक्षमपणे चालवत आहे., सांगली जिल्‍ह्याच्‍या कारखानदारीचा देशात लौकीक आहे, दरवर्षी राज्‍य व देशस्‍तरावर मिळणा-या पुरस्‍कारांत सांगली जिल्‍ह्यातील कारखाने अग्रभागी असतात. पण अजूनही साखर कारखानदारीने आधुनिकीकरणाचा अवलंब करावा. डिस्‍टीलरी, इथेनॉल नंतर आता सीएनजी, हायड्रोजन गॅस निर्मितीकडे वळण्‍याची गरज आहे. यातून परीसरातील युवकांच्‍या हाताला रोजगार मिळूण शेतकरीही आर्थिक सक्षम होतील.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील म्हणाले, क्रांतिअग्रणी डॉ. बापूनी सत्तेची पर्वा व सत्तेसाठी राजकारण केले नाही. आयुर्वेदाचे शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले. कृष्णा नदीच्या पाण्याच्या ताकदीची धार ब्रिटिशांनीही पहिली आहे. ब्रिटिशविरोधी चळवळीत या भागातील अनेकजण सामील झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही बापू स्वस्थ न बसता सर्वसामान्य घटकांना न्याय मिळण्यासाठी झटत राहिले. या चांगल्‍या कामाचा वारसा आमदार अरुणअण्णा व शरद लाड जपत आहेत. भविष्यातील लढाई एकसंधपणे कशी लढली पाहिजे. कृष्‍णेच्‍या पाण्‍याने स्वाभिमान गहाण ठेवण्याची भूमिका कधीही शिकवली नाही. सध्‍या सत्तेसाठी समाजात दुही माजवण्याचे काम सुरु आहे. त्‍यामुळे बहुजन समाज एकत्र आला पाहिजे.


खा. संजय पाटील म्हणाले, ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिअग्रणी जी.डी.बापूंनी मोठे योगदान दिले. साखर कारखानदारीच्या माध्‍यमातून या परिसराचा सर्वांगिण विकास झाला आहे.


आमदार डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, क्रांतिअग्रणी बापूंचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व श्रेष्ठ आहे. बापूंनी राज्यात जे काम उभे केले ते शब्दात मांडता येणारे नाही. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही सर्वसामान्याच्या अडचणी समजून घेत अविरत कार्य केले.बापूंच्या विचाराने क्रांती उद्योग समूह सक्षमपणे सुरु आहे. बापू व डॉ.पतंगराव कदम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. भविष्यातही लाड व कदम कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे नाते कायम राहिल, अशी आशा आहे. डॉ. कदम यांनी सर्वांचे मार्गदर्शन घेऊन या भागाचा विकास केला. क्रांती, सोनहिरा आणि राजारामबापू या तिन्ही कारखान्यांना राज्यात आदर्श मानले जाते. निम्मे पुरस्कार पलूस-कडेगाव तालुक्याला जात आहेत, ही अभिमानाची बाब आहे.  
आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा बसविल्‍याशिवाय बापूंच्या स्मारकाचे लोकार्पण करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास शासनाकडून निधी उपलब्ध झाला. क्रांतिसिह आणि जी डी बापूंचा कोणताही कार्यक्रम शरद पवार यांच्‍याशिवाय होऊच शकत नाही. स्‍फूर्तीस्‍थळ चालते-बोलते बापूच साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यातून भावी पिढी घडेल. कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून क्रांतिअग्रणींचा वारसा सक्षमपणे चालवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


शरद लाड म्हणाले, सर्वसामान्‍यां बरोबरची नाळ घट्ट ठेवावी ही शिकवण बापूंनी आम्हाला दिली. बापूंचे जन्मशताब्दी वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात आले. साखर कारखाना प्रगतीपथावर आहे. कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून ऊस विकासाचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. ऊस उत्पादक आर्थिक सक्षम होण्यासाठी क्रांती कारखाना कायम बांधील आहे. तसेच परिसरातील युवकांना रोजगार देण्‍याची भूमिका क्रांती समूहाची आहे. याबरोबरच निराधारांना आधार देण्याचे काम सुरु आहे. याप्रसंगी बांधकाम व्यवसायिक वसंतराव वाजे यांचा सत्कार आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार व जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष मानसिंगराव नाईक, आमदार सर्वश्री बबनराव शिंदे, सुमन पाटील, विक्रमसिंह सावंत, शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाशिव पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, हुतात्‍मा कारखान्‍याचे अध्‍यक्ष वैभव नायकवडी, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, माजी संचालक किरण लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, युवा नेते प्रतीक पाटील, युवा नेते रोहित आर. आर. पाटील, शरद फाउंडेशनच्‍या अध्‍यक्षा धनश्री लाड, अविनाश पाटील, वसंतराव वाजे, ॲड. सुभाष पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, सर्व संचालक, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे यांच्‍यासह मान्‍यवर उपस्थित होते.


यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी खुमासदार भाषणात भाजपला टोले लावताना खासदार संजय पाटील यांना कानात बोटे घाला असे म्हणाले आणि लोकांमध्ये एकच हशा पिकली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆