BANNER

The Janshakti News

देशाची उभारणी, विकास, आणि प्रगतीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान..... जिल्हा सचिव गजानन पाटील.




●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●




●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

=====================================


=====================================   

भिलवडी | दि. ०९ ऑक्टोबर २०२२

 देश उभारणी, प्रगती आणि विकास कामात आजच्या जेष्ठ नागरिकांचा मोठा त्याग आणि योगदान आहे याचा आपण सर्वांनी विसर पडू देता कामा नये. विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशात आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या क्षेत्रात खूप काबाडकष्ट केले, अनेक कठीण प्रसंगात आपल्या जीवाची बाजी लावली. संपूर्ण भारतभर कोणत्याही जाती धर्माच्या आणि वंशी भेदाच्या पलीकडे जाऊन विविधतेने नटलेल्या आपल्या भारत भूमीच्या विकास आणि प्रगतीत मोलाचे काम केले, परंतु सर्वच क्षेत्रात आज तो परावलंबी झाला आहे. शरीर क्षीण झाल्याने आयुष्याच्या उत्तरार्धात आता त्याला शासनाच्या विविध योजना आणि लाभाच्या आधाराची गरज आहे. केवळ आरोग्य आणि औषधोपचारच नव्हे तर दवाखाने, फुटपाथ, वाचनालय, बगीचे, स्वसंरक्षण आणि स्वच्छता ग्रह यासारख्या नागरी सुविधांची विशेष श्रेणीच्या स्वरूपात सोयी करून देणे गरजेचे आहे. याशिवाय उर्वरित गरजापुरतीसाठी दरमहा दहा हजार रुपये सन्मानधन देऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण शासनाने करावे, एवढी मापक अपेक्षा शासनाकडून करणे काही गैर नाही असे मत अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचचे ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान चे जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी व्यक्त केले.


       माळवाडी तालुका पलूस येथील हनुमान मंदिर मध्ये गुरुवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता झालेल्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील होते. श्री पाटील पुढे म्हणाले आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंब आणि समाजावर काही संस्कार केले परंतु सुसंस्कार करण्यात ते कमी पडले. कुटुंबाच्या सक्षम उभारणीसाठी त्यांनी कष्ट आणि फक्त कष्टच केले, मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह, घर उभारणे, शेती दुरुस्त करणे असे करता करता आपण ज्येष्ठ नागरिक कधी झालो हे कळलेच नाही. आणि ह्याच मुलांना आता आम्ही घरामध्ये आडगळ वाटू लागलो याची खंत मनाला स्वस्थ बसू देत नाही. ज्यांच्यासाठी उभ आयुष्य राब राब राबलो त्यांनाच त्यांची जाणीव होईना आणि म्हणून कुटुंबीयांवर आम्ही संस्कार केले परंतु सुसंस्कार करायचे विसरलो याची कबुली द्यायला आम्हाला कमीपणा वाटत नाही अशा भावना ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठ नागरिक व्यक्त करत आहेत.
    डोळ्यात अश्रू आणणारे अनेक प्रसंग उभे करून संघटनेचे कायदेविषयक सल्लागार एडवोकेट किरण पाटील यांनी आपले विचार मांडले. वाळवा तालुका सचिव श्री आर एन मोहिते, कोषाध्यक्ष हनुमंतराव पाटील, गव्हाण तालुका तासगाव चे अध्यक्ष श्री अरुण पाटील यांनी आपले विचार मांडले.


    ज्येष्ठ नागरिकांना सन्मानधन हवे असेल तर ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी करून स्वतंत्र मतदार यादी करणे आवश्यक आहे असे विचार कार्यक्रमाचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले संप , मोर्चे, आंदोलने, आणि अर्ज विनंती करण्याचे दिवस आता संपले आहेत. शासन चालवणाऱ्या कार्यकर्त्यांना फक्त मताचीच भाषा कळते आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र मतदार यादी करण्याचे काम या वर्षभरामध्ये आपण करूया. या ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या मदतीने आपण सरकार बदलू शकतो, सरकार बनवू शकतो तर मग आता विलंब का.
   कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या सर्व धर्मीय प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे सत्कार झाल्यानंतर 85 वर्षे पूर्ण केलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा आणि दहा ज्येष्ठ महिला नागरिकांचा विशेष सत्कार प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंगराव पवार, औदुंबर चे बबन मुळीक, पलूसचे सुभाष शिंदे, भिलवडी चे चंद्रकांत कुलकर्णी माळवाडी चे बिस्मिल्ला सुतार, महेश यादव, माळवाडी च्या सरपंच आणि ग्रामपंचायतीचे सदस्य माजी सरपंच कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रमासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती.


      शेवटी जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी माळवाडी गावची अर्थक्रांती जेष्ठ नागरिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्यास मान्यता दिली. शेवटी रंगराव पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆