बुरुंगवाडी येथे विजय जाधव यांच्या पाऊसकाळ कादंबरीचे प्रकाशन..
भिलवडी |दि. ३१/१०/२०२१
नैतिक मूल्यांच्या अध:पतनाचे पाणी जेव्हा डोक्यावरून जाते तेव्हा पाऊसकाळ होतो.निसर्ग किंवा पाणी नव्हे तर आपल्यातील हिंसकता व अनैतिकतेचा महापूर माणूस उध्दवस्त करीत आहे.विजय जाधव यांची पाऊसकाळ ही कादंबरी संवेदनशील,जाणत्या व प्रतिभावंत लेखकाची अस्सल कलाकृती असल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी केले.
मौज प्रकाशन गृह, मुंबई, क्षितीज गुरुकुल विद्यानिकेतन आणि ग्रामपंचायत, बुरुंगवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक विजय जाधव यांच्या 'पाऊसकाळ' या कादंबरीचा प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मोहन पाटील,समीक्षक डॉ. रणधीर शिंदे,ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे,
ग्रामीण कथाकार आप्पासाहेब खोत
लेखक नामदेव माळी,द्राक्षगुरु वसंतराव माळी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.मोहन पाटील म्हणाले की,ऊस पिकाच्या आगमनाने कृष्णाकाठावर समृध्दी आली असली तरी संपत्तीने येथील मूळ संस्कृती गिळंकृत केली.विजय जाधव यांनी महापुरातील कोरडेपणा तटस्थपणे मांडला आहे.
विजय चोरमारे म्हणाले की,संपत चाललेली माणूसकी व संकटात लुबाडणाऱ्या मानवी प्रवृत्तीचा कधीच न संपणारा लढा पाऊस काळ या कादंबरीत अनुभवायला मिळतो.
डॉ.रणधीर शिंदे म्हणाले की, महापूरा सारख्या नैसर्गिक आपत्ती मध्ये विविध कृषी संस्कृती मधील स्थित्यंतरे व समाजपरिवर्तनाचा आलेख मांडणारी पाऊसकाळ ही मराठी भाषेतील महत्वाची कादंबरी आहे.
प्रा.आप्पासाहेब खोत म्हणाले की,मातीशी नाळ जुळल्याशिवाय दर्जेदार साहित्याची निर्मिती होत नाही पाऊसकाळ हा महापूराने उध्दवस्त होणाऱ्या गावगाड्याचा आराखडा आहे.
विजय जाधव यांच्या कादंबरीतून बाणेदार पानाचे दर्शन होत असल्याचे मत नामदेव माळी यांनी व्यक्त केले.
लेखक विजय जाधव व सौ विद्या जाधव यांचा कृष्णाकाठच्या साहित्यिक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सुनिल जाधव यांनी प्रास्ताविक केले.शरद जाधव यांनी सूत्रसंचालन तर हिंमत पाटील यांनी आभार मानले.
यावेळी सरपंच सौ.अस्मिता बनसोडे,उपसरपंच राजेश चव्हाण,सौ.रोहिणी कदम,प्रा.जी. एस.साळुंखे,संजय पाटील,सुनिल भोसले,रमजान मुल्ला,महादेव माने,जयवंत आवटे, दयासागर बन्ने,महेश कराडकर,
प्रा.संतोष काळे,शांतीनाथ मांगले,सुधीर कदम,रवि राजमाने,सत्येंद्र कामत,सर्जेराव खरात,दत्ता सपकाळ,नामदेव भोसले,संदिप नाझरे,डॉ.सुनिता बोर्डे,लता ऐवळे कदम यांच्यासह जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.