सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगलीच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय तंत्रनिकेतन, मिरज, गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली व राष्ट्ररत्न विठ्ठल सखाराम पागे कृषि माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तासगाव येथे ‘करिअर समुपदेशन’ विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत यंग प्रोफेशनल तथा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगलीचे प्रविण बनकर यांनी शासकीय तंत्रनिकेतन, मिरज येथे अंतिम वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर समुपदेशन’ विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये डिप्लोमा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या विविध संधी, कौशल्य विकास प्रशिक्षण, अप्रेंटिसशिपच्या संधी, उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार व उद्योजकता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता व कौशल्ये लक्षात घेऊन उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध पर्यायांबाबत मार्गदर्शन केले.
गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली येथे जिल्हा कौशल्य विकास सहायक अमोल बोळाज यांनी इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमांतर्गत, नवोपक्रम व स्टार्टअपच्या अनुषंगाने तसेच कौशल्य विकासाच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.
राष्ट्ररत्न विठ्ठल सखाराम पागे कृषि माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तासगाव येथे कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये कौशल विकास कार्यालयाचे संतोष माने, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक धनश्री जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कृषि क्षेत्रातील बदलत्या रोजगाराच्या संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विविध कौशल्यांचे महत्त्व, कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगारक्षमतेत वाढ तसेच कृषि क्षेत्रातील भविष्यातील करिअरच्या विविध संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणानंतरच्या करिअरच्या विविध पर्यायांची माहिती मिळाली. तसेच रोजगार, कौशल्य विकास, अप्रेंटिसशिप आणि उद्योजकतेच्या उपलब्ध संधीचा योग्य पद्धतीने लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दिशा मिळाली.





