- जत तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ व माडग्याळ येथे पिकांची पाहणी
सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये. नागरिक व पशुधनासाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले असून, शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज दिली.
जत तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ व माडग्याळ येथे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, झालेले नुकसान तसेच पिण्याचे पाणी व चाऱ्याबाबतच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी जतचे उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, संख अपर तहसीलदार रोहिणी शंकरदास, तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नायब तहसिलदार श्री. धोडमाळ, मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलीस पाटील, बाधित खातेदार तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, व्हसपेठ परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी दोन दिवसापूर्वी म्हैसाळ योजनेचे पाणी व्हसपेठ तलावात भरून घेण्यात येत आहे. त्याचा उपयोग परिसरातील सुमारे 10 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी करता येणार आहे. जत तालुक्यातील विविध तलावांमध्ये उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले असून, कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या स्तरावर नियोजन करण्यात आले आहे.
पिकांचे पंचनामे व पीक कापणी प्रयोग सुरू
जत तालुक्यात खरीप हंगाम 2026 मध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार शेतजमिनींच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. जत हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून, महसूल व कृषी विभागाच्या पथकांकडून प्रत्यक्ष शेतनिहाय पाहणी करून नुकसानीची नोंद घेण्यात येत आहे. मका, मूग, उडीद यासह विविध पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासोबतच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे, त्यांच्यासाठी पीक कापणी प्रयोगही सुरू करण्यात आले आहेत. पंचनाम्यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
मागेल त्याला टँकर
जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी स्तरावर देण्यात आले असून, टँकरची मागणी प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत तातडीने कार्यवाही करता येणार आहे. टँकर भरण्यासाठी आवश्यक पाणीसाठ्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
पशुधनासाठी पाणी व चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित
सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पशुधनाचे संरक्षण करणे महत्त्वाचे असून, पशुधनासाठी पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यास प्रशासनाचे प्राधान्य आहे. उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला असून, ज्या भागातून चाऱ्याची अथवा चारा बियाण्याची मागणी प्राप्त होईल, त्या भागात आवश्यकतेनुसार चारा व चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले.
अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन
जत तालुका मोठा असल्याने शेतकऱ्यांनी स्थानिक महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे. तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या अडचणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील. पिण्याचे पाणी, चारा किंवा पिकांच्या नुकसानीसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. शेतकऱ्यांचे नुकसान व अडचणी दूर करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन आवश्यक ती कार्यवाही करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी स्पष्ट केले.








